अशोक खरातच्या शिजूका, नॉडी कोण?; अंजली दमानियांचा खळबळजनक दावा, कुणीकुणी कॉल केले?
अंजली दमानिया, अशोक खरात प्रकरण: नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याची गेल्या काही दिवसांपासून पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून रोज चौकशी सुरु आहे. या चौकशीत आतापर्यंत अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. याचदरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी पुन्हा एकदा अशोक खरात प्रकरणात खळबळजनक दावा केला आहे.
अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी अशोक खरातचा सीडीआर समोर आणला होता. यामध्ये अशोक खरातसोबत कोण कितीवेळा बोललं, याची माहिती अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली होती. त्यानंतर आता पु्न्हा नवीन माहिती अंजली दमानिया यांनी समोर आणली आहे. अशोक खरातला शिजूका, नॉडी या नावाने अनेक फोन कॉल्स आले होते. शिजूका, नॉडी नावाने असंख्य कॉल्स अशोक खरातला आल्याचं दिसून येत आहे, असा दावा अंजली दमानियांनी केला आहे. सीडीआरमधील नंबर मी ट्रूकॉलरवर सर्च केलं. त्यावेळी शिजूका, नॉडीचे नाव समोर आले. अशोक खरातने अनेक नंबर्संना कोडवर्ड दिले होते. त्याचाच हा प्रकार असल्याचं अंजली दमानियांनी सांगितले. (Anjali Damania On Ashok Kharat)
खरातच्या पत्नीच्या मैत्रिणी, नोकरांकडे चौकशी; कल्पना खरात अद्याप फरार- (Ashok Kharat Wife Kalpana Kharat)
शिर्डी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा कल्पना खरातवर दाखल झाल्यापासून खरातची पत्नी कल्पना नाशिकच्या घरून फरार झाली आहे. दहा दिवस होऊनही तपास यंत्रणेला तिला शोधण्यात अपयश आले आहे.म्हणून पोलिसांनी तपासाची चक्र फिरवले असून कल्पनाच्या माहेरी तसेच माहेरच्या तिच्या नातेवाईकांकडे चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. कल्पना खरातच्या नाशिकमधील काही मैत्रिणी, तसेच तिच्या घरी सध्या काम करणाऱ्या आणि यापूर्वी काम केलेल्या काही नोकरांकडेही कल्पनाची चौकशी करण्यात आली. पथकाला काही ठोस पुरावे मिळत नसल्याने फरार कल्पनाचा शोध पोलीसाकडून सुरू आहे.
अशोक खरात यांनी सोलापुरातही खरेदी केली करोडोंची मालमत्ता- (अशोक खरात प्रकरण)
भोंदूबाबा अशोक खरात याने सोलापुरात देखील कोट्यावधी रुपयांची मालमत्ता खरेदी केल्याचे समोर आले आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण गावात भोंदू अशोक खरात याने कोट्यावधी रुपयांची जमीन खरेदी केलीय. कळमण गावातील गट क्रमांक 200/1 मधील 4.48 हेक्टर म्हणजे सुमारे 11 एकरांपेक्षा अधिक जमीन अशोक खरात यांच्या नावावर खरेदी करण्यात आली आहे. 28 मार्च 2024 रोजी झालेल्या या व्यवहाराची किंमत तब्बल 2 कोटी 40 लाख 91 हजार 200 रुपये इतकी असल्याची नोंद खरेदीखतात आहे. या व्यवहारात अशोक खरातची पत्नी कल्पना अशोक खरात हिला कुलमुखत्यार म्हणून अधिकार देण्यात आलेले असल्याचेही खरेदीखतात नमूद आहे.विशेष म्हणजे उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण गावातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. प्राथमिक माहितीनुसार कळमण गावात जमिनीचे साधारण भाव हे प्रति एकर 5-6 लाख रुपये प्रति एकर आहेत. मात्र भोंदू अशोक खरात याने तब्बल 21 ते 22 लाख रुपये प्रति एकर ही जमीन खरेदी केली आहे.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.