दीपक साळुंखेंचा 4 घोटाळ्याच हात, पक्षात घेऊ नका; सोलापुरातील मिशन लोटसला भाजप नेत्याचा विरोध


मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) मिशन लोटस पुन्हा सुरू केलं असून माजी आमदार, तसेच विधानसभेतील नाराज उमेदवारांना गळ घातला आहे. भाजपच्या मिशन लोटसमध्ये सोलापुरात (Solapur) सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे दिसून येते. कारण, कधीकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यातील 5 माजी आमदार भाजपच्या गोटात जाणार असल्याची चर्चा आहे. त्यापैकी, 4 माजी आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतल्याचे समजते. तर, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माजी आमदार दीपक साळुंखे यांची भेट घेत त्यांच्या प्रवेशाचे संकेत दिले आहेत. मात्र, आता दीपक साळुंखेंच्या पक्षप्रवेशाला भाजपमधूनच विरोध आहे. सोलापूर जिल्हा माजी अध्यक्ष श्रीकांत देशमुख (श्रीकांत देशमुख) यांनी पत्रकार परिषद घेत दीपक साळुंखेंवर गंभीर आरोप केले आहेत.

सोलापूर जिल्ह्यात भाजपचे मिशन लोटस जोरदार सुरू असून लवकरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी आमदार दीपक साळुंखे पाटील हे देखील भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. मात्र, भाजपचेच माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप करीत पक्षाला सतर्क करण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेत देशमुख यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. पद्मभूषण वसंतदादा पाटील सहकारी सुतगिरणी, विद्या विकास मंडळ, बळीराजा फलोत्पादक संघ तसेच स्वस्त धान्य दुकान या 4 प्रकरणात माजी आमदार दिपक साळुंखे यांनी घोटाळा केला असल्याचा आणि याबाबत चौकशी सुरू असल्याचे दावा देशमुख यांनी केला आहे. शासन निधीचा अपहार, बेकायदेशीर कर्ज, खोटी कागदपत्रे, यांसह कोट्यवधीचा अवैध व्यवहार त्यांनी केला असल्याने पक्षाने त्यांना भाजपमध्ये घेण्यास आपला विरोध असल्याचे देशमुख यांनी म्हटलं आहे.

विधानसभेला शिवसेना उबाठा पक्षात प्रवेश

सध्या सोलापूर जिल्ह्यात ज्या पद्धतीने दिवाळीचे राजकीय फटाके फुटत आहेत, ते पुढेही असेच फुटत राहतील असे संकेत पालकमंत्री विजयकुमार गोरे यांनी दिले. सांगोला येथे माजी आमदार दीपक साळुंखे यांच्या कार्यालयात पालकमंत्री गोरे यांचा जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना गोरे यांनी दीपक साळुंखे यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत दिले होते. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात सोलापूर जिल्ह्यातले चार माजी आमदार पालकमंत्री गोरे यांच्या माध्यमातून भाजप प्रवेशाच्या तयारीत असताना आता पूर्वाश्रमीचे शरद पवार यांचे कट्टर समर्थक आणि सध्या शिवसेना उबाठा पक्षातील नेते दीपक साळुखे हेही भाजपच्या वाटेवर आहे. मात्र, साळुंखे यांच्या पक्षप्रवेशाला आता भाजप नेत्यांचाच विरोध असल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे, भाजपच्या मिशन लोटसमध्ये दीपक साळुंखेंचं कमळ खुलणार की नाही, हे लवकरच स्पष्ट होईल. दरम्यान, दीपक साळुंखे यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, सांगोला मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला.

हेही वाचा

महसूलमंत्र्यांकडून दिवाळी भेट, 47 अधिकाऱ्यांना बढत्या; महाराष्ट्राला मिळाले 47 नवे अपर जिल्हाधिकारी

आणखी वाचा

Comments are closed.