2027 पर्यंत ‘एल निनो’चे संकट, महाराष्ट्रावर काय होणार परिणाम? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स

एल निनोवर देवेंद्र फडणवीस : जागतिक हवामानावर मोठा परिणाम करणाऱ्या प्रशांत महासागरात आता ‘एल निनो’ (El Nino) सक्रिय झाल्याची अधिकृत घोषणा अमेरिकेच्या ‘नोआ’ (NOAA) या संस्थेच्या ‘क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने’ केली आहे. यंदाचा एल निनो हा 1950 नंतरचा सर्वाधिक तीव्र असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, याचा थेट परिणाम महाराष्ट्रातील मान्सून आणि शेतीवर (Monsoon and Agriculture) होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठी तयारी सुरू केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी राज्यातील शेतकऱ्यांना घाईगडबडीत पेरण्या न करता सरकारी सल्ल्यानुसारच पावले टाकण्याचे आवाहन केले आहे.

Devendra Fadnavis on El Nino: फेब्रुवारी 2027 पर्यंत संकट कायम राहण्याचा अंदाज

क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने (CPC) गुरुवारी जारी केलेल्या अंदाजानुसार, प्रशांत महासागरातील न्यूट्रल स्थिती संपून आता एल निनो पूर्णपणे विकसित झाला आहे. डिसेंबर 2026 पर्यंत हा एल निनो अति तीव्र स्वरूपाचा होणार असून, फेब्रुवारी 2027 मध्येही तो सक्रिय राहण्याची शक्यता 90 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. या जागतिक हवामान बदलामुळे (Climate Change) दक्षिण आशियात आणि विशेषतः भारतात पाऊस कमी पडण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

Devendra Fadnavis on El Nino: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “एल निनो संदर्भात आपण तयारी करत आहोत. मी माझ्या बजेटच्या भाषणामध्येच एल निनो संदर्भात वाच्यता केली होती. त्याचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होईल. त्यामुळे त्याची तयारी आपण सुरू केलेली आहे. आपण टास्क फोर्स तयार केला आहे. जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर कशी पूर्ण करता येतील हा आपला प्रयत्न आहे. कारण पाऊस कमी पडल्यानंतर मोठी धरण कामे येत नाहीत, पाऊस कमी पडल्यानंतर जलसंधारणाची छोटी स्ट्रक्चर्स कामी येतात. त्यामुळे त्यावर आपण खूप मोठ्या प्रमाणावर भर दिला आहे. प्रत्येक जिल्ह्याला टारगेट देऊन जलसंधारणाची स्ट्रक्चर्स कशी पूर्ण करायची याबाबत आपण सांगितले आहे.

चाऱ्याची टंचाई निर्माण होऊ शकते त्या दृष्टीने पशुसंवर्धन विभाग आणि कृषी विभाग यांना सूचना देऊन वैरण विकासाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. जेणेकरून आपल्याकडे चारा उपलब्ध असेल. पण ही गोष्ट खरी आहे की, ज्या पद्धतीचे संकेत येत आहेत त्यात अडचण मोठी असेल, पाऊस कमी पडणार आहे, त्यातून आपण मार्ग काढू, असे त्यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, विशेषतः आम्ही शेतकऱ्यांना सल्ला देत आहोत. राज्य सरकारच्या सल्ल्यावर आधारित जर शेतकऱ्यांनी पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही. नेहमीच्या पद्धतीने पेरणी केली तर पावसाच्या अभावामुळे पेरण्या वाया जातील आणि दुबार पेरणीची वेळ येईल. त्यामुळे आतापर्यंत शेतकऱ्यांनी संयम ठेवलेला आहे, तसाच शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडून येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांकडे (Advisory) लक्ष द्यावे. आम्ही एसएमएस (SMS) देखील पाठवत आहोत, महाविस्तार ॲपवर देखील आम्ही सगळी माहिती देत आहोत, त्या अनुषंगानेच शेतकऱ्यांनी पेरण्या कराव्या, असे आवाहन देखील त्यांनी केली आहे.

आणखी वाचा

El Nino Update : 1950 नंतरचा सर्वात भीषण ‘एल निनो’ सक्रिय! मान्सूनसाठी धोक्याची घंटा; भारतावर दुष्काळाचे सावट? डिसेंबरमध्ये धारण करणार अतितीव्र रूप

Comments are closed.