मोदी महायुतीच्या आमदारांना भेटणार, पण धनंजय मुंडेंना बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं?
मुंबई: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासाला चांगलीच गती आली आहे. देशमुख यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याच्या संशयाखाली वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्यावर मंगळवारी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कलमान्वये (मकोका) गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाल्मिक कराड हे राज्याचे नागरी व अन्नपुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे आता याप्रकरणात धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. वाल्मिक कराड यांच्यावर मकोका लागल्यानंतर मंगळवार संध्याकाळी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात बैठक झाली. अवघ्या 10 मिनिटांची चर्चा झाल्यानंतर धनंजय मुंडे या बैठकीतून बाहेर पडले. यानंतर धनंजय मुंडे थेट परळीच्या दिशेने रवाना झाल्याचे सांगितले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी ते महायुतीच्या सर्व आमदारांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे इतका महत्त्वाचा कार्यक्रम सोडून धनंजय मुंडे परळीला का गेले, यावरुन आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.
धनंजय मुंडे हे परळीला जाण्यामागे प्रामुख्याने दोन कारणे सांगितली जात आहेत. त्यापैकी कारण म्हणजे परळी आणि बीड जिल्ह्यात तापलेले वातावरण शांत करण्याची गरज आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील मारेकऱ्यांना पकडण्यात झालेली दिरंगाई, वाल्मिक कराडला शोधण्यात पोलिसांना आलेले अपयश आणि एसआयटी पथकात कराड यांच्या निकटवर्तीय अधिकाऱ्यांचा असलेला समावेश अशा आरोपांमुळे बीड प्रकरणात सरकारची प्रतिमा काहीशी मलीन झाली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यासाठी महायुतीच्या गोटातूनही दबाव वाढल्याची चर्चा आहे. मात्र, तुर्तास अजितदादांनी धनंजय मुंडे यांना अभय दिले आहे. परंतु, यामुळे बीड जिल्ह्यातील वातावरण दिवसेंदिवस तापत आहे.
वाल्मिक कराड यांच्यावर मकोका लागावा आणि निष्पक्ष: तपासासाठी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे. संतोष देशमुख यांचे कुटुंबीय याप्रकरणाच्या तपासातील प्रत्येक त्रुटींवर बोट ठेवत आहेत. अशातच वाल्मिक कराडला मकोका लागल्यानंतर परळीत कराड समर्थक आक्रमक झाले आहेत. त्यांनी परळीत टायरची जाळपोळ आणि दुकाने बंद करण्याचा उद्योग गेला. अजित पवार यांनी कालच्या बैठकीत धनंजय मुंडे यांच्याकडून परळीतील परिस्थितीची माहिती घेतली. परळी आणि बीड जिल्ह्यातील वातावरण आणखी चिघळल्यास ते सरकारच्या प्रतिमेला मारक ठरु शकते. त्यामुळे अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांनाच तेथील परिस्थिती हाताळायला परळीत पाठवले असावे, अशी चर्चा आहे.
मोदींच्या बैठकीपासून धनंजय मुंडेंना जाणीवपूर्वक दूर ठेवलं?
संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांचा कुठेही थेट सहभाग दिसून आलेला नाही. मात्र, वाल्मिक कराड हा मुंडेंचा निकटवर्तीय असल्याने धनंजय मुंडे ‘कलंकित’ झाले आहेत. त्यामुळेच अशा कलंकित नेत्याला पंतप्रधान मोदींपासून दूर ठेवण्यासाठी धनंजय मुंडे यांना परळीला पाठवण्यात आले असावे का, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात रंगली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते महायुतीचे आमदार आणि नेत्यांसोबत संवाद साधणार आहेत. मोदींनी या कार्यक्रमासाठी तब्बल अडीच तासांचा वेळ राखून ठेवला आहे. मात्र, संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन बीडमधील वातावरण चिघळले असताना धनंजय मुंडे आणि मोदींची भेट झाल्यास त्याची विनाकारण चर्चा होऊ शकते. भविष्यात वाल्मिक कराड किंवा धनंजय मुंडे यांच्यावर आणखी गंभीर दोषारोप झाल्यास आणि कोणतीही कारवाई न झाल्यास त्याचा संबंध मोदींच्या भेटीशी जोडला जाऊ शकतो. धनंजय मुंडे गंभीर आरोपांच्या गर्तेत सापडले असूनही मोदींनी काही केले नाही, असा संदेश जनमानसात जाऊ शकतो. एकूणच या सगळ्यामुळे थेट पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेला बट्टा लागू शकतो. त्यामुळे धनंजय मुंडे यांना जाणीवपूर्वक या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यासाठी परळीला पाठवण्यात आल्याचा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.
आणखी वाचा
वाल्मिक कराडभोवतीचा तपासाचा फास कसा आवळला? त्या 6 फोन कॉलमुळे मकोका लागला, नेमकं काय घडलं?
अधिक पाहा..
Comments are closed.