सीमांकनासाठी द्रमुकचा पाठिंबा शक्य

तामिळनाडूचे प्रमाण स्थिर राखण्याची ठेवली अट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

लोकसभा मतदारसंघांचे परिसीमन करुन त्यांची संख्या सध्याच्या 543 वरुन 850 पर्यंत नेण्याची केंद्र सरकारची योजना आहे. 30 नोव्हेंबरपासून प्रारंभ होणारे संसदेचे विशेष अधिवेशन याच कारणासाठी आयोजित करण्यात आले आहे, अशी चर्चा आहे. अद्याप केंद्र सरकारने तशी अधिकृत घोषणा केलेली नाही. तथापि, त्या दिशेने सर्व सज्जता करण्यात येत असल्याचे दिसून येते. परिसीमनास समर्थन देण्यास तामिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षाने समर्थन दिल्याचे वृत्त आहे. मात्र, लोकसभेतील तामिळनाडूच्या प्रतिनिधित्वाचे प्रमाण परिसीमनानंतरही कमी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी अट या पक्षाने ठेवल्याचे दिसून येत आहे.

परिसीमनाचे विधेयक संमत करुन घेण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये दोन तृतियांश बहुमताची आवश्यकता आहे. गेल्या एप्रिलमध्ये केंद्र सरकारने हे विधेयक संसदेच्या विशेष अधिवेशनात सादर केले होते. तथापि, दोन तृतियांश बहुमत प्राप्त न झाल्याने विधेयक संमत होऊ शकले नाही. आताही संसदेच्या विशेष अधिवेशनाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे हे अधिवेशन या विधेयकासाठीच आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. केंद्र सरकारने यावेळी अधिक सज्जता करुन दोन तृतियांश बहुमत मिळण्याची शाश्वती प्राप्त केल्याची चर्चा आहे. द्रमुक प्रमाणेच तृणमूल काँग्रेस पक्षातून बाहेर गेलेले खासदार आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस गट यांचे समर्थन सरकारला मिळणार आहे.

किती मतांची आवश्यकता…

लोकसभेची सदस्यसंख्या सध्या 541 इतकी आहे. त्यांच्यापैकी एकजण लोकसभेचे अध्यक्ष आहेत. ते वगळता केंद्र सरकारला 360 मतांची जुळणी करावी लागणार आहे. लोकसभेत मतदानाच्या वेळी विरोधकांचे काही सदस्य अनुपस्थित राहिल्यास दोन तृतियांश बहुमताची संख्या आणखी कमी होऊ शकते. कारण हे बहुमत लोकसभेत मतदान करणाऱ्या खासदारांच्या संख्येवर अवलंबून आहे. राज्यसभेत केंद्र सरकार दोन तृतीयांश बहुमताची पातळी गाठू शकण्याच्या परिस्थितीत आहे. त्यामुळे लोकसभेत प्रयत्न यशस्वी होणे आवश्यक मानले जाते.

द्रमुकची आणखी एक अट

परिसीमनाला समर्थन देण्यासाठी द्रमुकने आणखी एक अट ठेवली आहे. यावेळी परिसीमन झाल्यानंतर पुढील पंचवीस वर्षे त्यात कोणतेही परिवर्तन करण्यात येणार नाही, अशी व्यवस्था विधेयकात असावी, असे या पक्षाचे म्हणणे आहे. ते मान्य करण्यास केंद्र सरकार सज्ज असल्याचे दिसून येते. त्यामुळे द्रमुकचे समर्थन केंद्र सरकारने गृहित धरले आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आता केली जात आहे.

सध्याची स्थिती काय आहे…

सध्या केंद्र सरकारकडे 292 सदस्यांचे संख्याबळ लोकसभेत आहे. द्रमुकचे 22 सदस्य आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 8 सदस्य आहेत. तसेच तृणमूल काँग्रेस सोडून अन्य पक्षात प्रवेश केलेले 20 सदस्य आहेत. मधल्या काळात शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे सहा खासदार शिवसेनेत आलेले आहेत. याचा अर्थ असा की, या 56 सदस्यांचे अतिरिक्त संख्याबळ केंद्र सरकारकडे आहे. ही संख्या एकंदर 348 होते. याखेरीज अपक्ष आणि छोटे पक्ष मिळून केंद्र सरकारकडे 361 सदस्यांचे बळ असल्याची चर्चा आहे. कदाचित तृणमूल काँग्रेसमध्ये उरलेले 8 सदस्यही या विधेयकाचे समर्थक करण्याचा निर्णय घेतील, असे बोलले जात आहे.

अखिलेश यादव यांचा इशारा

समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे. परिसीमन विधेयक सादर केले गेल्यास ती केंद्र सरकारची मोठी चूक ठरेल, असे त्यांचे म्हणणे आहे. या विधेयकाला पुरेसे समर्थन मिळणार नाही, असे त्यांचे अनुमान आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधेयकाचा निर्धार केल्याचे दिसते.

केंद्र सरकारसह पुरेसे संख्याबळ ?

ड लोकसभेत विधेयक संमत होण्यासाठी केंद्र सरकारला 360 संख्याबळ हवे

ड एवढे संख्याबळ प्राप्त असल्याची केंद्र सरकारला शाश्वती असल्याची चर्चा

ड भाजपकडून ‘ऑपरेशन लोटस’ होत असल्याचा काँग्रेसकडून झाला आरोप

Comments are closed.