प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी वापरावर बंदी, नागपुरातील हिवाळी अधिवेशनावरून दुष्काळाचा ‘चटका’
विदर्भातील कोरडय़ा दुष्काळाचा चटका नागपूरमधील हिवाळी अधिवेशनालाही बसणार आहे. अधिवेशन काळात नागपुरात होणारी शहराबाहेरील पाहुण्यांची गर्दी पाहता अव्याहत पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे आव्हान आहे. त्या पार्श्वभूमीवर पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी प्रशासनाने प्लॅस्टिकच्या बाटलीतील पाणी वापरावर बंदी घातली आहे. मंत्री, आमदार आणि प्रशासकीय अधिकाऱयांच्या शासकीय निवासस्थानी काचेच्या बाटल्यांमधून पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे.
नागपूर जिह्यातील 14 तालुके दुकाळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. नागपूर शहराला पाणी पुरवणाऱया तोतलाडोह धरणाचा पाणीसाठा झपाटय़ाने कमी होत आहे. अशा परिस्थितीत 7 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनासाठी मंत्री, आमदार, त्यांचे कार्यकर्ते, सनदी अधिकारी, विविध संस्था, संघटनांचे आंदोलक असे किमान 20 ते 25 हजार लोक नागपुरात येतात. नागपूर शहराला दररोज साधारण 740 दशलक्ष लिटर पाणी लागते. अधिवेशन काळात हा वापर वाढतो. त्याचबरोबर नासाडीही मोठय़ा प्रमाणात होते. ते रोखण्यासाठी पावले उचलण्यात येत असून त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्वतंत्र पथक तैनात करण्यात येणार आहे.
पाणी वापराची टोटल लागेना!
अधिवेशनासाठी आमदार निवासात 1935 व्यक्ती, 160 खोल्यांच्या गाळ्यांमध्ये 1250, रवी भवनमध्ये 357, सुयोगमध्ये 120, पीए क्वार्टर्समध्ये 120, राज्यमंत्र्यांच्या क्वार्टर्समध्ये 96, हॉस्टेलमध्ये 80, विधिमंडळ सचिव इमारतीमध्ये 36, नाग भवनमध्ये 21 व्यक्तींच्या निवासाची व्यवस्था आहे. येथील पाणी वापराबरोबरच मंत्र्यांचे बंगले आणि आमदारांचे वास्तव्य असलेली थ्री स्टार, फाइव्ह स्टार हॉटेलांमध्ये किती पाणी लागेल याचा अंदाज अद्यापही प्रशासनाला आलेला नाही.
मंत्र्यांच्या बंगल्याबाहेर 20 लिटरचे जार
नागपूरमधील बहुतेक तालुके ट्रिगर वन अंतर्गत दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे नागपूर महापालिका व जिल्हा प्रशासनाने पाण्याच्या गैरवापरावर कठोर निर्बंध घातले आहेत. पिण्यासाठी पाण्याच्या बाटल्या दिल्या तर बाटलीतील पाणी अनेक जण पूर्णपणे संपवत नाहीत. शिल्लक राहिलेले पाणी फेकून दिले जाते. त्यामुळे मोठी नासाडी होते. हे टाळण्यासाठी मंत्र्यांचे बंगले आणि दालनाबाहेर वीस लिटरचे पाण्याचे जार आणि पेपर ग्लास ठेवण्यात येणार आहेत.
अधिवेशन काळातच पाणीकपात?
नागपूर शहराला तोतलाडोह धरणातून पाणीपुरवठा होतो. पाऊस कमी झाल्यामुळे या वर्षी हे धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही. या धरणाची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत चालली आहे. नोव्हेंबर महिन्यातच पाणीसाठा मे महिन्यातील पातळीपर्यंत खाली गेला आहे. त्यामुळे मोठे पाणी संकट डोक्यावर आहे. धरणातील पाणीसाठय़ामध्ये रोज एक टक्क्याने घट होत आहे. त्यामुळे हे पाणी अधिक काळ पुरवण्याच्या दृष्टिकोनातून अधिवेशन काळात दहा टक्के पाणीकपातीचा विचार स्थानिक प्रशासनाने सुरू केला आहे.
Comments are closed.