एमपीएससीचा पेपरफुटीचा मुख्य सूत्रधार आयोगातलाच; अधिकारी नाकते याने लॅपटॉपवर 300 प्रश्न टाईप करून पार्किंगमध्ये फोडले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीचा मुख्य सूत्रधार कुणी बाहेरचा नसून आयोगातलाच निघाला आहे. आयोगातील सहाय्यक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नाकते याने प्रश्नसंचातील 300 प्रश्न लॅपटॉपवर टाईप केले आणि त्यांची प्रिंट काढून नवी मुंबईतील आयोगाच्या कार्यालयातील पार्किंगमध्ये एका वरिष्ठ अधिकाऱयाला दिली, असे उघड झाले आहे.

मुंबई गुन्हे शाखेने या पेपरफुटी प्रकरणाचा तपास करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या विशेष न्यायालयात तीन हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले. त्यातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाकते याला या पेपरफुटीचा मुख्य सूत्रधार ठरवण्यात आले आहे. नवी मुंबईतील एमपीएससीच्या कार्यालयात अंतिम प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱया प्रश्नांचा संच सांभाळण्याची जबाबदारी नकाते याच्यावर होती. त्याचाच गैरफायदा त्याने घेतला. त्यातून चोरलेले प्रश्न त्याने आयोगातील अवर सचिव अभिजित लेंडवे याला दिले आणि त्याच्यामार्फत ते इतर आरोपींपर्यंत पोहोचले.

नाकते आणि लेंडवे यांच्यासह गोपाळ मराठे, प्रवीण पाटील, अमृत पाटील आणि गौरव पाटील अशा सहा जणांच्या नावांचा समावेश पहिल्या आरोपपत्रात आहे.  या प्रकरणात 13 जणांना आतापर्यंत अटक झाली असून दोन आरोपी अजूनही फरार आहेत.

Comments are closed.