गुरुवार-शुक्रवार मुंबईत पाणी बंद! पिंप, टाक्या, बादल्या, वाट्याही भरून ठेवा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील साठा कमी झाल्याने मुंबईकर आधीच पाणीकपातीचे संकट झेलत आहेत. अशातच पुढील दोन दिवस मुंबईकरांवरील पाणीसंकट आणखी गडद होणार आहे. महापालिकेने हाती घेतलेल्या तांत्रिक कामांमुळे मुंबईतील अनेक भागांत गुरुवार आणि शुक्रवार असा दोन दिवस पाणीपुरवठा ठप्प होणार आहे. यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. तसेच पुढील दोन दिवसांच्या पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. अगदी पिंप, टाक्या, बादल्या, वाटय़ाही भरून पाणी साठवून ठेवावे लागणार आहे, तरच पाण्याची दैनंदिन गरज भागवली जाईल.

यंदा मान्सूनने दगा दिल्यामुळे धरणे उशिरा भरली. त्यानंतर आता धरणांमधील पाणीसाठा कमी होत आहे. उपलब्ध पाणी पुढील वर्षी जुलै महिन्यापर्यंत पुरविण्याचे आव्हान महापालिकेसमोर आहे. त्यामुळे मुंबईकरांची परीक्षाच राहणार आहे. आता मुंबई महापालिकेने पवई उच्चस्तरीय जलाशय क्रमांक 1 ते सहार गावदरम्यान मुख्य जलवाहिन्यांवरील गळती दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. गुरुवार, 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून ते शुक्रवार, 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तास दुरुस्तीचे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे ‘जी उत्तर’, ‘के दक्षिण’, ‘के उत्तर’, ‘एच पूर्व’ आणि ‘एस’ विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.  ‘के दक्षिण’, ‘एस’ व ‘एन’ या विभागातील काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

कोणत्या भागात पाणीबाणी

जी उत्तर विभाग, के दक्षिण व के उत्तर विभाग, 3. एच पूर्व विभाग,  एस विभाग,  एन विभाग या विभागातील काही भागांत 26 आणि काही भागात 27 नोव्हेंबर रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

या विभागात कमी दाबाने पाणीपुरवठा

अप्पर डेपो पाडा, लोअर डेपो पाडा, सागर नगर, महानगरपालिका इमारत विभाग,  विक्रोळी पश्चिम रेल्वे स्टेशन मार्ग, फिरोजशाह नगर, गोदरेज कुंपण, मेफेअर इमारती, कैलाश संकुल,  वाधवा निवासी, प्रेसिडेन्शियल टॉवर्स, कल्पतरू संकुल, आर-सिटी मॉल, ऑर्किड्स इमारती, दामोदर पार्क, पंकेश बाबा दर्गा, उद्यान गल्ली, संघानी इस्टेट, श्रेयस सिनेमा, साईनाथ नगर, नित्यानंद नगर .

पाणी गाळून-उकळून प्यावे

या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा. पाणी जपून वापरावे. तसेच गळती दुरुस्ती कार्यवाहीनंतर पुढील तीन ते चार दिवस गढूळ पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

10 टक्के कपातीमुळे आधीच फटका

‘एल-निनो’च्या प्रभावामुळे राज्य सरकारने पालिकेला ऑगस्ट 2027 पर्यंतच्या पाणीपुरवठय़ाचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार मुंबईत आधीच 10 टक्के पाणीकपात असल्याने उंचावरील भागांसह अनेक भागांत पुरेसे पाणी मिळत नाही. त्यातच तब्बल दोन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचा मोठा फटका मुंबईकरांना बसणार आहे.

Comments are closed.