दुष्काळाचे भीषण संकट; हिरवागार कोकण तहानलेला, भात-नाचणीची पिपं करपली, 183 गावांना टँकरने पाणीपुरवठा
यंदा अत्यल्प पावसामुळे संपूर्ण कोकणावर दुष्काळाचे भीषण सावट निर्माण झाले आहे. नेहमी हिरवागार दिसणारा कोकण यंदा पाण्यासाठी तहानलेला असून रत्नागिरी जिह्यातील तब्बल 183 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार आहे. पावसाअभावी तळकोकणातील भात आणि नाचणीची पिके करपून गेली. तर ठाणे जिह्यात खुरासणी, नागली, उडीद आणि वरी या पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. एकूणच पावसाच्या लहरीपणाचा फटका कोकणातील शेती आणि जनजीवनाला बसला असून हिरव्यागार कोकणावर दुष्काळाचे संकट गडद झाले आहे.
रत्नागिरी जिह्यात यंदा फक्त 77 टक्के पाऊस पडला आहे. पावसावर अवलंबून असलेली भातशेती आणि नाचणीचे पीक करपून गेले आहे. दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात होणारी पाणीटंचाई आता जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यातच उद्भवण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. रत्नागिरी जिह्यातील राजापूर, रत्नागिरी, लांजा, संगमेश्वर, खेड, मंडणगड आणि चिपळूण या तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहे. जिह्यातील नगरपरिषदांनी 10 टक्के पाणीकपात सुरू केली आहे.
सिंधुदुर्ग जिह्यातील तब्बल 80 टक्के धरणे पूर्ण क्षमतेने भरली नाहीत. सावंतवाडी, कुडाळ, मालवण आणि कणकवली या प्रमुख तालुक्यांसह संपूर्ण जिह्यातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. सद्यस्थितीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय या ठिकाणी दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी पाणी कपातीची घोषणा प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
मुंबईची तहान भागवणारी भातसा, तानसा, मोडक सागर यांसारखी मोठी जलाशये शहापूर तालुक्यात आहेत, परंतु या तालुक्यातील शेतकऱयाची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. तालुक्यातील भाताच्या 14 हजार 800 हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल सात हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र बाधित झाले आहे. नागलीचे 425 हेक्टर, वरीचे 1 हजार 528 हेक्टर, खुरासणीचे 86 हेक्टर आणि तिळाचे सहा हेक्टर क्षेत्र 100 टक्के नुकसानग्रस्त झाले आहे. त्यातच पाणीटंचाईमुळे भातसा कालव्यातून यंदा सिंचनासाठी पाणी सोडले जाणार नसल्याने शेतकऱयांवर दुहेरी संकट कोसळले आहे.
ठाण्यात पिकांची प्रचंड नुकसान
‘ठाणे जिह्यातील धरणांचा तालुका’ अशी ओळख असलेल्या शहापूर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थितीने डोके वर काढले आहे. पावसाने दीर्घकाळ ओढ दिल्याने पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. त्यातच पावसाच्या लहरीपणाचा मोठा फटका शेतीला बसला. पिकांचे 100 टक्के नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. भातपिकाच्या उत्पादनातही 50 टक्क्यांहून अधिक घट होण्याची शक्यता आहे.
पशुपालकांसमोरही मोठे संकट
ऐन भातामध्ये दाणा भरण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावरच पावसाने दडी मारल्यामुळे जिह्यातील भातशेती धोक्यात आली असून शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाच्या अनियमितपणामुळे शेतीसोबतच पशुपालकांसमोरही मोठे संकट उभे राहिले आहे. भातपिकाचे नुकसान झाल्यामुळे जनावरांच्या चाऱयाचा प्रश्न गंभीर बनला आहे. एकीकडे हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने बळीराजा हवालदिल झाला असताना दुसरीकडे धरणांमधील अपुऱ्या पाणीसाठय़ामुळे उन्हाळ्यातील तीव्र पाणीटंचाईची भीती व्यक्त केली जात आहे.
रायगडात शेती उद्ध्वस्त
- निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका रायगड जिह्याला बसण्याची चिन्हे आहेत. तब्बल 25 टक्क्यांहून अधिक भाताचे उत्पादन घटण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतीपाठोपाठ पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होण्याची भीती आहे. धरणांमधील घटता पाणीसाठा, खालावणारी भूजल पातळी यामुळे रायगडावर पाणीटंचाईचे संकट घोंगावू लागले आहे. रायगड जिह्याची अर्थव्यवस्था मोठय़ा प्रमाणावर भातशेतीवर अवलंबून आहे. परंतु पावसाच्या अनियमिततेचा मोठा फटका यंदा भातपिकाला बसला आहे. पावसाने ओढ दिल्याने भातपिकाच्या लोंब्यात दाणेच भरले गेले नाहीत. आधीच वाढता शेती खर्च. त्यात नैसर्गिक अस्मानी यामुळे बळीराजावर आर्थिक संकट कोसळण्याचा धोका असल्याने ते हवालदिल झाले आहेत.
- श्रीवर्धन तालुक्यातील रानवली धरणात अवघा 42 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. कार्ले धरणात 53 टक्के, डोणवत धरणात 73 टक्के तर उन्हाडे धरणात 78 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे उन्हाळय़ात पाण्याचे नियोजन करताना प्रशासनाची कसोटी लागणार आहे. सध्या दहा टक्के असलेली पाणीकपात 20 ते 25 टक्क्यांवर जाईल की काय याची चिंता रायगडकरांना आहे.
सरकारने जी शेतकऱयांना नुकसानभरपाई जाहीर केली ती कोकणातील शेतकऱयांना मिळाली नाही. फार्मर आयडी आणि ई-केवायसीच्या कचाटय़ात अडकल्याने अनेक शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहिले आहेत. जे शेतकरी दुसऱयांच्या जमिनीत शेती करत होते ते वंचित राहिले आहेत. दुष्काळामुळे भात आणि नाचणी पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. रत्नागिरी 8 महाबीज हे कोकण कृषी विद्यापीठाचे बियाणे थोडय़ाफार प्रमाणात उगवले. जे काही भात पिकले होते ते नंतर आलेल्या पावसाने उद्ध्वस्त केले. – संतोष थेराडे, जिल्हा परिषद सदस्य, रत्नागिरी
सप्टेंबरपासून पावसाने पाठ फिरवल्याने भात आणि नाचणी पिपं उद्ध्वस्त झाली. पाण्याअभावी दाणा धरला नाही. ज्यांनी इकडून-तिकडून पाणी आणून शेती केली त्यांच्या मळ्यात थोडे फार भात पिकले. पण ज्याच्यांकडे पाणी नव्हते ती शेती करपून गेली. यंदा शेतीचे नुकसान झाल्याने गावातील शेतकरी दोनशे-अडीचशेच्या रोजावर कामावर जातोय. अशी भीषण परिस्थिती यंदा कोकणात आहे. – हरिश्चंद्र धावडे, शेतकरी, कोतवडे (रत्नागिरी)
पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे
भात शेती वाया गेली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न किती गंभीर आहे याची चाचपणी करून पाण्याची उपलब्धता करणे गरजेचे आहे. सध्याचे वातावरण अनुकूल नसून रोगराई पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे भीषण पाणीटंचाई आणि संभाव्य आरोग्याच्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहायला हवे. – रूपेश राऊळ, शेतकरी, सावंतवाडी
Comments are closed.