‘राज’ की बात राजही रहने दो; शिवतीर्थवरील राजभेटीनंतर एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
मुंबई : राज्यभरात गणपती (Ganeshotsav) बाप्पांचे जल्लोषात स्वागत करण्यात आल्यानंतर आता दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचे आज विविध जिल्ह्यात विसर्जन करण्यात आले. मुंबई, ठाण्यासह कोकणातील बहुतांश ठिकाणी दीड दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यात आला. मुंबईतील (Mumbai) गणेशोत्सव देशात चर्चेत असतो, विशेष म्हणजे येथील राजकीय नेत्यांच्या घरातील गणपती बाप्पांचे दर्शन घेण्याची वेगळीच परंपरा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरीही गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांपासून ते बड्या राजकीय नेत्यांनी गाठीभेटी दिल्या. त्यामध्ये, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भेट देत राज ठाकरे घरातील गणरायाचे दर्शन घेतले. या राजभेटीनंतर त्यांनी मिश्कील आणि तितकीच सूचक राजकीय प्रतिक्रिया दिली.
राज ठाकरे यांच्या घरी दरवर्षी दीड दिवसांचा गणपती असतो. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट दिली. तत्पूर्वी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचले होते. शिवतीर्थवरून उद्धव ठाकरे बाहेर पडताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या घरी बाप्पांचे दर्शन घेतले. त्यानंतर, एकनाथ शिंदे यांनीही शिवतीर्थवर गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. यावेळी, एकनाथ शिंदेनी राजकीय प्रतिक्रिया देत सस्पेन्स वाढवला.
‘राज’ की बात राझही रहने दो, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंच्या भेटीनंतर राजकीय सस्पेन्स वाढवला आहे. आमच्यात जी चर्चा झाली, ती खाजगीच राहु द्या. काही लोकांना आता स्नेहसंबंध आठवले आहेत. मात्र, आमचा स्नेह आधीपासूनच आहे. आमच्यात स्नेह असल्यानं लवकरच भोजनही होईल, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले. राज ठाकरेंच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावत आपली भूमिका स्पष्ट केली.
ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा
दरम्यान, राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे गेल्या काही महिन्यात ठाकरे बंधूंच्या गाठीभेटीही सातत्याने होत आहेत. तर, दोन्ही ठाकरेंकडून एकत्र निवडणुका लढवण्याबाबतचे संकेतही दिले जात आहेत. त्यामुळे, एकनाथ शिंदे आणि भाजप महायुतीला निवडणुकीत फटका बसेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यासंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर यापूर्वी एकनाथ शिंदेंनी मला विकास कामाबाबत विचार, असे म्हणत राग व्यक्त केला होता. मात्र, आज राजभेटीनंतर एकनाथ शिंदेंनी सूचक प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
हेही वाचा
‘म्हाडा’चे घर घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज; 5285 सदनिकांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; इच्छुकांना आणखी एक संधी
आणखी वाचा
Comments are closed.