गणपती बाप्पा मोरया… कोकणात जाणाऱ्यांना टोलमाफी, निर्णय जारी; प्रवाशांना पास कुठे, कसा मिळेल?

मुंबई : गणेशोत्सव (Ganeshotsav) हा मराठीजनांचा सर्वात मोठा उत्सव असून यंदाच्या वर्षापासून राज्य उत्सव म्हणून साजरा होत आहे. त्यासाठी, राज्य सरकारने काही एसओपी देखील जारी केली असून गणेश मंडळांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईसह कोकणातील गणेशभक्तांसाठी, चाकरमान्यांसाठी गणेशोत्सव म्हणजे उत्सवाची पर्वणीच असते. लाखो कोकणवासी गणेशोत्सव काळात गावी, कोकणात जाऊन गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. त्यामुळेच, यंदाही कोकणातील गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकेनाथ शिंडे (एकनाथ शिंदे) यांनी याबाबतची माहिती दिली. त्यासाठी, गणेश भक्तांना पास मिळवण्यासाठी यंत्रणाही उभी करण्यात येत आहे.

यंदाच्या गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोल नाक्यांवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना आणि एसटी बसेसना टोलमाफी मिळणार आहे. त्यासाठी “गणेशोत्सव 2025 – कोकण दर्शन” या नावाचे विशेष टोलमाफी पास देण्यात येणार असून त्यावर वाहन क्रमांक व वाहन मालकाची माहिती नोंदवली जाईल.

गणेशभक्तांना हे पास संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस व वाहतूक विभागाकडे उपलब्ध असतील. परतीच्या प्रवासासाठी देखील हेच पास ग्राह्य धरले जाणार आहेत. शासनाच्या आदेशानुसार ग्रामीण व शहरी पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन विभागाने ते पास वाटपाचे समन्वय साधून प्रवाशांना वेळेत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचनाही एकनाथ शिंदेंनी दिल्या आहेत. तसेच या संदर्भात जाहीरात व सूचना प्रसिद्ध करून जनतेला माहिती देण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.दरम्यान, राज्य सरकारचा हा निर्णय कोकणात जाणाऱ्या लाखो भाविकांच्या प्रवासाला मोठा दिलासा ठरणार आहे. तसेच, गणेशभक्तांचा उत्साह द्विगुणीत करणारा आहे. त्यामुळेच, गणपती बाप्पा मोरया… जयघोष आता कोकणला जाणाऱ्या मार्गावर पाहायला मिळेल.

दरम्यान, मुंबईतील कोकणवासीयांना गणेशोत्सवात आपल्या गावी येण्यासाठी कोकणातील नेते सोयी-सुविधा देत असतात. मंत्री नितेश राणे यांनीही गणेशोत्सवासाठी कोकणात गावी येणाऱ्यांसाठी विशेष रेल्वेसेवा देण्याचे सांगितले असून हा प्रवास मोफत असणार आहे. त्यामुळे, गणेशभक्तांचा प्रवास अधिक सुकर होईल.

हेही वाचा

धनंजय मुंडेंनी ‘ती’ फाईल गायब केली, उपसचिवांकडून कन्फर्म; अंजली दमानियांचा दावा, पत्र शेअर

आणखी वाचा

Comments are closed.