मनमाडमधील प्रभाग 10 ची निवडणूक रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय; धुळे अन् गेवराईत काय होणार?
नाशिक : राज्यातील 246 नगरपालिका आणि 46 नगरपंचायत निवडणुकांसाठी (Election) निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असून वरिष्ठ नेते प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह विविध पक्षांचे स्टार प्रचारक नेते सभा घेऊन मतदारांना आवाहन करत आहेत. दरम्यान, राज्यातील 100 पेक्षा जास्त उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याने त्या प्रभागात निवडणूक होणार नाही. तर, निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरल्यापासून दोन उमेदवारांचा मृत्यू झाल्याने तेथील निवडणुकांचे काय होणार असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच, आता मनमाड (नाशिक) नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 10 ची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 10 मधील निवडणूक स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणूक लढवणारे ठाकरे गटाचे उमेदवार नितीन वाघमारे यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने ही निवडणूक स्थगित करण्यात आल्याची माहिती आहे. मनमाडसह धुळ्याच्या पिंपळनेर नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक 2 ची देखील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. तर, बीड जिल्ह्यातील गेवराई येथील नगरपरिषदेतही एका महिला उमेदवाराचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे, तेथील निवडणूक देखील रद्द होऊ शकते.
2 उमेदवारांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
नगर परिषदेच्या निवडणुकीची राज्यभरात रणधुमाळी सुरू असतानाच मनमाडमध्ये एक दुःखद घटना घडली. मनमाड शहरातील प्रभाग क्रमांक 10 अ मधील शिवसेना उबाठाचे उमेदवार नितीन वाघमारे यांचा काल रात्री हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे मनमाडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. नितीन वाघमारे यांच्या निधनाने प्रभाग क्रमांक 10 मधील निवडणूक कार्यक्रमावर त्याचा परिणाम झाला. तर, बीडच्या गेवराई नगर परिषद प्रभाग क्रमांक 11 अ च्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला उमेदवाराचे देखील हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. दूरदाना बेगम सलीमोद्दीन फारुकी असे या महिला उमेदवाराचे नाव असून त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गेवराई नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र, आज अचानक हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. दरम्यान, उमेदवाराच्या या निधनानंतर प्रभाग क्रमांक अ मधील निवडणूक रद्द होण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान, राज्यात येत्या 2 डिसेंबर रोजी नगरपालिका निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया संपन्न होणार असून 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.