अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींच्या फाशीला स्थगिती.

अबू बरेलवीला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

गुजरातच्या अहमदाबाद येथे 2008 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावलेल्या अबू अबुबकर बरेलवीला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. बरेलवीने त्याच्या शिक्षेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायालयाने नोटीस बजावली असून सध्या तरी त्याच्या फाशीची अंमलबजावणी केली जाणार नाही, असे म्हटले आहे. त्याने गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दोषी अहमद बावा अबू अबुबकर बरेलवीच्या याचिकेवर नोटीस बजावली आहे. बरेलवीने गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे, ज्यामध्ये त्याची शिक्षा आणि मृत्युदंडाची शिक्षा कायम ठेवण्यात आली होती. बरेलवी याला केवळ कटाच्या आधारावर दोषी ठरवण्यात आले होते, असे त्याच्या वकिलांनी न्यायमूर्ती विक्रम नाथ यांच्या खंडपीठाला सांगितले. त्यांनी गुजरात न्यायालयाच्या निकालाच्या भाषांतरासाठी अर्जही दाखल केला आहे. कनिष्ठ न्यायालयाची कागदपत्रे स्थानिक भाषेत असल्याचा मुद्दाही त्यांनी सर्वोच्च न्यायालयात उपस्थित केला आहे.

उच्च न्यायालयात 38 जणांची फाशी कायम

7 जुलै 2026 रोजी गुजरात उच्च न्यायालयाने विशेष न्यायालयाच्या निर्णयाला कायम ठेवत 38 जणांच्या फाशीच्या शिक्षेला कायम ठेवले होते. तसेच न्यायालयाने 11 दोषींची जन्मठेपेची शिक्षाही कायम ठेवली होती. अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने फेब्रुवारी 2022 मध्ये आपला निकाल जाहीर करत 49 पैकी 38 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती.

साखळी बॉम्बस्फोट 56 जणांचा मृत्यू

26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 21 ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये 56 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच 250 हून अधिक जण जखमी झाले. सायंकाळी 6:30 ते रात्री 8:15 च्या दरम्यान 20 ठिकाणी झालेल्या या स्फोटांची जबाबदारी इंडियन मुजाहिद्दीनने (आयएम) स्वीकारली होती. सरकारी रुग्णालये, अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटल आणि एलजी हॉस्पिटल, बसस्थानके, बाजारपेठा आणि पार्किंग लॉट्स यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी सायकली आणि गाड्यांमध्ये टिफिन बॉम्ब ठेवून स्फोट घडवण्यात आले होते.

Comments are closed.