एफडीएची धडक कारवाई; मुंबईमधील 10 हॉटेल्स, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंटवर अन्न व औषध प्रशासनाने (fda) पुन्हा बडगा उगारला असून 10 हॉटेल्सचे परवाने निलंबित केले आहे. तर 8 व्यावसायिकांना बंदची नोटीस बजावली आहे. अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी हे धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे नियमबाह्य पद्धतीने काम करणाऱ्या हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत घाटकोपर पश्चिमेतील आयान्स दरबार चायनीज रेस्टॉरंट, खंडेलवाल अँड सन्स आणि महाराष्ट्र ज्यूस अँड स्नॅक्स सेंटर, गोवंडीतील अल अशरफ हॉटेल, स्टार चायनीज, साकीनाका येथील झेप्टो डार्प स्टोअर, झायका बिर्याणी आणि स्पाइस एन आईस हॉटेल, कांजूरमार्ग येथील रॉयल पंजाब रेस्टॉरंट अँड बार, गोरेगाव पूर्व येथील डी. एस. या हॉटेल रेस्टॉरंटची तपासणी केली. त्यात चायनीज रेस्टॉरंटमध्ये कीटकांचा प्रादुर्भाव, अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक, स्वच्छतेचा अभाव, कच्चे चिकन जमिनीवर ठेवणे, करपलेले तेल वापरणे आणि स्वच्छतेच्या गंभीर त्रुटी आढळल्या, तर हॉटेलमध्ये दुधाचे पदार्थ उघडय़ावर ठेवणे, अस्वच्छ भांडी, ज्यूस सेंटरमध्ये फ्लेवर इसेन्स आणि रंगाचा वापर केल्याचे आढळले. झेप्टो स्टोअरमध्ये झुरळ, मुदतबाह्य व खराब पॅकिंगमधील पदार्थ साठवलेले दिसले. तसेच स्वीट दुकानातील माव्याचे नमुने तपासले असता ते असुरक्षित ठरले. या सर्व निकष आणि नियमांच्या आधारे एफडीएने त्यांचे परवाने निलंबित केले आहेत.

आठ व्यावसायिकांना बंदची नोटीस

कारवाईदरम्यान एफडीएच्या पथकाला चांदिवलीतील सहा व्यावसायिकांसह चेंबूर पूर्व आणि साकीनाका परिसरातील आणखी दोन व्यावसायिक विनापरवाना व्यवसाय करत असल्याचे आढळले. त्यांना तातडीने व्यवसाय बंद ठेवण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या.

Comments are closed.