दिवाळी ‘कडू’ करणाऱ्यांची खैर नाही! FDA करणार कडक कारवाई; काय म्हणाले तुकाराम मुंढे? वाचा..

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दिवाळीत नागरिकांना कालबाह्य अन्न देऊ नका, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा सक्त इशारा अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्न व्यावसायिकांना दिला आहे. दिवाळीत खाद्य संस्कृतीला महत्त्व असल्याने पदार्थ तयार करताना योग्य तेलाचा वापर करणे गरजेचे असून, भेसळयुक्त तेलाविरोधातील मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

FDA ने आतापर्यंत खाद्यतेलाच्या १०८९ तपासण्या केल्या असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८० जणांचे परवाने रद्द केले आहेत. या कारवाईत तब्बल २८,७५३ क्विंटल माल जप्त करण्यात आला आहे. कालबाह्य अन्नाची एकही पिशवी बाजारात येणार नाही, याची खबरदारी घेणे ही केवळ विक्रेत्याची नव्हे, तर सर्व संबंधितांची जबाबदारी असल्याचे मुंढे यांनी बजावले. कंपनी छोटी असो वा मोठी, सर्वांना नियमांचे पालन करावेच लागेल.

खराब झालेले अन्न नष्ट न करता केवळ विल्हेवाट प्रमाणपत्र दाखवून एजंटद्वारे पुन्हा पुरवठा साखळीत आणले जात असल्याचा धक्कादायक प्रकार FDA च्या निदर्शनास आला आहे. या पदार्थांच्या तारखेतही फेरफार केली जात होती. यावर आळा घालण्यासाठी FDA ने एक्स्पायर रिटर्न अँड डॅमेज फूड, अशी नवी कंप्लायन्स ऑर्डर काढली आहे. अशा प्रकारचा नियम लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या नव्या नियमानुसार, आता कालबाह्य झालेले अन्न पूर्णपणे नष्ट केल्याचा पुरावा कंपन्यांना द्यावा लागणार आहे.

गेल्या १५ दिवसांत FDA ने भिवंडीत सुरुवातीला ८० हजार रुपयांचा आणि नंतर तब्बल २६ लाख रुपयांचा साठा जप्त केला आहे. वडपे येथेही दोन ठिकाणी कारवाई करून परवाने निलंबित करण्यात आले आहेत. आतापर्यंतच्या विविध कारवायांमध्ये मिळून तब्बल ५ कोटी रुपयांचा कालबाह्य साठा जप्त करण्यात आला असून, १० कारवायांनंतर २ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात मालकांसह ३२ आरोपींची नावे समाविष्ट आहेत. कालबाह्य माल गोदामात वेगळ्या ठिकाणी ठेवणे बंधनकारक असताना तसे न आढळल्याने या कारवाया करण्यात आल्या आहेत. ही केवळ एका दिवसाची कारवाई नसून गेल्या दोन महिन्यांपासून हे अभियान सुरू असल्याची माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली.

Comments are closed.