FIFA World Cup 2026: केप वर्देची ऐतिहासिक कामगिरी, 'राऊंड ऑफ 32' मध्ये प्रवेश करणारा ठरला जगातील सर्वात छोटा देश!
फिफा विश्वचषकात पदार्पण करणाऱ्या केप वर्देने २०२६ च्या आवृत्तीमधील त्यांची जबरदस्त कामगिरी सुरूच ठेवली आहे. त्यांनी शुक्रवारी (२६ जून) ह्युस्टनमध्ये सौदी अरेबियासोबत ०-० ने सामना बरोबरीत सोडवून इतिहास रचला. त्याचबरोबर केप वर्दे ‘राऊंड ऑफ ३२’ मध्ये (बाद फेरी) पोहोचणारा सर्वात छोटा देश ठरला आहे. आता त्यांचा या फेरीत सामना गतविजेत्या अर्जेंटिनाशी होणार आहे.
केप वर्दे पुरुष विश्वचषकाच्या बाद फेरीपर्यंत पोहचणारा लोकसंख्येनुसार सर्वात लहान देश ठरला. त्यांची लोकसंख्या ५,३०,००० आहे. त्यांनी विश्वचषकात पोहोचलेल्या त्यांच्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या देशांनाही मागे टाकले आहे. कुराकाओ आणि आईसलंड, जे अनुक्रमे २०२६ आणि २०१८ मध्ये प्रथमच खेळले होते, मात्र ते गट फेरीनंतर स्पर्धेबाहेर झाले होते.
एच गटात शुक्रवारी केप वर्देचा सामना बरोबरीत राहिला, तर स्पेनने उरुग्वेवर १-० ने विजय मिळवला आणि केप वर्देसह स्पेनही बाद फेरीत पोहोचला. केप वर्देच्या या ऐतिहासिक कामगिरीमध्ये त्यांचा गोलकीपर वोझिन्हाची कामगिरी उल्लेखनीय राहिली. तसेच त्यांच्या या कामगिरीमागे त्यांचे प्रशिक्षक बुबिस्ता यांचाही हात आहे. त्यांनी इतिहास घडवण्याच्या संधीमुळे सुरूवातीच्या संघातील निम्मे खेळाडू बदलले. त्यातील काही बदल सक्तीचे होते, मात्र त्यांनी वोझिन्हाला कायम ठेवले.
४० वर्षीय वोझिन्हाने आपल्या पहिल्याच विश्वचषक सामन्यात स्पेनला रोखण्याची कामगिरी केली आणि स्पर्धेत पहिला गुण मिळवत संघाचे स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले. पुढील दोन्ही सामन्यांमध्येही त्याने उत्तम कामगिरी सुरूच ठेवली आणि केप वर्देने या पण सामन्यांमध्ये बरोबरी साधली (उरुग्वेविरुद्ध २-२, सौदी अरेबियाविरुद्ध ०-०). याचा अर्थ ते या स्पर्धेत साखळी फेरीत अजिंक्य राहिले आहेत.
सेनेगलनंतर २४ वर्षांत ही कामगिरी करणारा केप वर्दे पहिला संघ आहे. मोठ्या फुटबॉल स्पर्धेत गट फेरीतील तिन्ही सामने अनिर्णीत राहिल्याने पुढील फेरीत जाण्याची शक्यता नाही, मात्र भूतकाळात अनेक संघांनी असे केले आहे, ज्यामध्ये १९५८ मध्ये वेल्स, १९९० मध्ये आयर्लंड आणि नेदरलॅंडस, १९९८ मध्ये चिली यांचा समावेश आहे. तसेच २०१० च्या विश्वचषकात न्यूझीलंडनेही तीन सामने अनिर्णीत राखले होते, मात्र ते स्पर्धेतून बाहेर झाले होते.
Comments are closed.