राजस्थान ऑइल रिफायनरीला भीषण आग
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रम रद्द
वृत्तसंस्था / जयपूर
राजस्थानातील पदपचरा येथे हिंदुस्थान पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीच्या तेलशुद्धीकरण केंद्रात मोठी आग लागली आहे. शनिवारी सकाळी ही दुर्घटना घडली. संध्याकाळपर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आपदा निवारण विभागाला यश आल्याचे वृत्त देण्यात आले. आज मंगळवारी या तेलशुद्धीकरण केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार होती. यासाठी कंपनीने उद्घाटन सोहळ्यासाठी सर्व सज्जता केली होती. मात्र, आगीच्या घटनेमुळे हा उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली.
हे तेलशुद्धीकरण केंद्र बऱ्याच मोठ्या भागात पसरलेले आहे. या केंद्राच्या ऑईल डिस्टिलेशन विभागात ही आग लागली. आगीच्या मोठ्या ज्वाळा निर्माण झाल्या. सर्व कर्मचाऱ्यांना त्वरित तेथून बाहेर काढण्यात आले आहे. त्यामुळे जीवीतहानी टळली असल्याची माहिती देण्यात आली. मात्र, डिस्टिलेशन युनिटची काही प्रमाणात हानी झाली. अग्नीशामक दलाच्या अनेक गाड्या आग विझविण्यासाठी घटनास्थळी आणण्यात आल्या. त्यांनी काही तासांमध्ये आग आटोक्यात आणली.
संपूर्ण क्षेत्र केले रिकामे
आग लागल्यानंतर या भागातून सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले. त्यामुळे जीवीत हानी झालेली नाही. तसेच कोणीही व्यक्ती जखमी झालेली नाही. आगग्रस्त विभाग हा या तेलशुद्धीकरण केंद्राचा मुख्य विभाग आहे. या विभागात पाईललाईनच्या माध्यमातून कच्चे इंधन तेल आणले जाते. या युनिटमध्ये ते ऊर्ध्वपतित करुन शुद्ध केले जाते. नंतर ते वेगवेगळी उत्पादने निर्माण करण्यासाठी विविध अन्य भागांमध्ये नेण्यात येते, अशी माहिती व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
चौकशी केली जाणार
या घटनेची चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. उद्घाटनाच्या आदल्या दिवशीच ही घटना घडल्याने हा अपघात की घातपात हा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्व शक्यता गृहित धरुन चौकशी केली जावी, अशी मागणी केली जात आहे. प्रथमदर्शनी हा अपघातच असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
कारणांचा शोध घेणार
आग कोणत्या कारणांमुळे लागली असावी, याचा शोध घेण्यात येणार आहे. मात्र, व्यवस्थापनाचे प्रथम लक्ष्य आपदा निवारण आणि या केंद्राची दुरुस्ती आहे. ते पूर्ण झाल्यानंतर कारणांचा शोध घेण्यात येणार असून असे प्रकार भविष्यकाळात टाळण्यासाठी उपाय योजना केली जाईल, असे आश्वासन व्यवस्थापनाने दिले आहे.
आगडोंब, धुराचे साम्राज्य…
ड डिस्टिलेशन युनिटला आग लागल्यानंतर प्रचंड ज्वाळा, धुराचे साम्राज्य
ड पुढील सूचनेपर्यंत डिस्टिलेशन युनिट बंद ठेवण्याचा व्यवस्थापनाचा निर्णय
ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटनानंतर युनिट कार्यरत
Comments are closed.