गणपतीपुळे समुद्रात छत्रपती संभाजीनगरचे 8 तरुण बुडाले; तिघांना वाचवण्यात यश, 5 जणांचा शोध सुरू
पैठण तालुक्यातील बिडकीन येथील 19 तरुणांचा ग्रुप रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथे पर्यटनासाठी गेला होता. समुद्राच्या खोलीचा अंदाज न आल्याने यापैकी 8 तरुण समुद्रात बुडले होते. यापैकी तिघांना वाचवण्यात बचावपथकाला यश आले असून पाच तरुण अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाडे यांनी दिली. या तरुणांचा शोध सुरू असून बचाव पथकासह स्वतः अधीक्षकांनी सहभाग घेतला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन तसेच परिसरातील 19 पर्यटक रत्नागिरी येथे गेले आहेत. समुद्राचे पाणी पाहून काहींना पोहण्याचा मोह अवरला नाही. त्यामुळे हे सर्वजण पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने अचानक ते समुद्रात ओढले गेले. हा प्रकार त्यांच्या मित्रांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. तोपर्यंत काहीजण समुद्रात ओढले गेले. त्यात आदित्य संतोष राऊत (वय – 22), अनिकेत बंडू हिवराळे (वय – 20), आनंद राजू नरवडे (वय – 20), प्रेम दीपक आदमाने (वय – 19) व यश रामेश्वर कांबळे या पाच तरुणांचा बुडून अंत झाला.
बिडकीन परिसरात शोककळा पसरली
बिडकीन येथून तीन दिवसांपूर्वी या मुलांनी ट्रीप काढली होती. गावातून निघताना त्यांनी पाण्याचे जार, खाण्याचे साहित्य असे सर्व घेऊन गेले होते. आज दुपारी मुले बुडाल्याची माहिती बिडकीन येथे धडकताच परिसरात शोककळा पसरली आहे. बुडालेले तरुण हे अवघ्या 18 ते 22 वयोगटातील असून माहिती समजताच नागरिकांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक बगाडे यांचे शर्थीचे प्रयत्न
रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी गणपतीपुळे येथे धाव घेतली. समुद्रात गेलेल्या तरुणांच्या मृतदेहांच्या शोधकार्यासाठी त्यांनी स्वतः बचाव पथकासोबत समुद्रात धाव घेतली आहे. तिघांना वाचविण्यात यश आले मात्र, उर्वरित तरुणांच्या मृतदेहांची शोधाशोध सुरू आहे.
Comments are closed.