क्रीडा विश्वाला धक्का! अल्पवयीन सायकलपटूवर परदेशी प्रशिक्षकाने केला लैंगिक अत्याचार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पटियाला येथील ‘नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स’ येथे एका अल्पवयीन सायकलपटूवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. पोलिसांनी आरोपी प्रशिक्षकाविरोधात ‘पोक्सो’ (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मॅक्सट अयाझबायेव (वय ३४) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव असून, तो कझाकस्तानचा सायकलपटू आहे. सध्या तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पटियालाचे एसएसपी हरमनदीप सिंग हंस यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा पासपोर्ट जप्त करण्यात आला असून त्याच्या शोधासाठी दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच तो देश सोडून पळून जाऊ नये यासाठी सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सीमा नाक्यांवर लुकआऊट सर्कुलर (LOC) जारी करण्यात आले आहे.

प्रशिक्षण शिबिरादरम्यान घडला प्रकार

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १३ सप्टेंबर रोजी घडली. पीडित मुलगी नेताजी सुभाष राष्ट्रीय क्रीडा संस्था (NSNIS) संकुलातील ‘नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स’ येथे उच्चस्तरीय प्रशिक्षण शिबिरासाठी आली होती. तिने दिलेल्या तक्रारीवरून पटियाला येथील सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात १८ सप्टेंबर रोजी बलात्कार आणि ‘पोक्सो’ कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला.

आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागावर बंदी

आरोपी अयाझबायेव आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी हिंदुस्थानच्या सायकलिंग पथकासोबत जपानला रवाना होणार होता. मात्र, हे गंभीर आरोप समोर येताच त्याची प्रवास मंजुरी तातडीने रद्द करण्यात आली. ‘सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया’ने (CFI) त्याला निलंबित केले असून या प्रकरणाची चौकशी अंतर्गत तक्रार निवारण समितीकडे सोपवली आहे. आरोपीच्या शोधासाठी दिल्ली आणि एनसीआर परिसरातील विविध ठिकाणी छापे टाकण्यात येत असल्याची माहिती पटियाला शहराचे पोलीस अधीक्षक मोहित अगरवाल यांनी दिली.

Comments are closed.