गडहिंग्लजला दुष्काळासाठी मेंढरांनी रोखला रस्ता! आंदोलनाच्या दहाव्या दिवशी मेंढपाळांचा मोर्चा आजरा—चंदगड मार्गावरील वाहतूक विस्कळीत
‘गडहिंग्लज तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा’, या मागणीसाठी गेल्या दहा दिवसांपासून दसरा चौकात सर्वपक्षीय व शेतकरी बांधवांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या आज दहाव्या दिवशी मेंढपाळ बांधवांनी आपल्या मेंढय़ांसह आंदोलनात सहभाग नोंदविला. यावेळी भडगाव, संकेश्वर, आजरा रोडवरून मेंढरांचा कळप दसरा चौकात येऊन थांबल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.
यावेळी जि. प. सदस्य अमर चव्हाण, संग्रामसिंह कुपेकर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, बाळेश नाईक, सिद्धार्थ बन्ने आदींनी भूमिका मांडत, ‘सरकारने गडहिंग्लज तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करावा,’ अशी मागणी केली. जोपर्यंत सरकार गडहिंग्लज तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश करत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, मंत्री हसन मुश्रीफ यांनी आंदोलनस्थळी भेट देत संबोधित केले. दिवाळीनंतर गडहिंग्लज तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी नागेश चौगुले, स्वप्नील इंगवले, सचिन देसाई, अंकुश रणदिवे, शुक्राचार्य चोथे, अजित बंदी, गुंडू पाटील, युवासेनेचे अवधूत पाटील यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, शेतकरी व मेंढपाळ बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
Comments are closed.