गांधीनगर भूमापन कार्यालय असून खोळंबा; नागरिकांचे हेलपाटे! अधिकारी उपलब्ध करून द्या; करवीर शिवसेनेची मागणी
करवीर तालुक्यातील गांधीनगर येथील नगरभूमापन कार्यालय हे अधिकारी आणि कर्मचाऱयांच्या गैरहजेरीमुळे असून, खोळंबा झाले आहे. नागरिकांना सातत्याने हेलपाटे मारावे लागत असल्याने याप्रकरणी तत्काळ संबंधित अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयात उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून भूमिअभिलेख विभाग करवीरचे उपअधीक्षक किरण माने यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
दरम्यान, मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवसांसाठी संबंधित कार्यालयात अधिकाऱयांना उपस्थित राहण्यास तसेच लोकांची प्रलंबित कामे करण्यास सांगू, असे आश्वासन माने यांनी शिष्टमंडळाला दिले.यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, पोपट दांगट, कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, बाळासाहेब नलवडे, योगेश लोहार आदी शिवसैनिक उपस्थित होते.
गांधीनगर सज्जामध्ये वळीवडे, चिंचवाड, गडमुडशिंगी, वसगडे, सांगवडे, सांगवडेवाडी, गांधीनगर ही मूळ गावे आहेत. ड्रोन सर्वेक्षणानंतर गोकुळ शिरगाव, हलसवडे, तामगाव, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, न्यू वाडदे, नेर्ली अशी अतिरिक्त गावे जोडण्यात आली आहेत. त्यामुळे या सज्जामध्ये नगरभूमापन कामात प्रचंड ताण वाढला आहे. अर्जांची मोठय़ा प्रमाणावर आवक व तक्रारींची संख्या वाढलेली आहे. मुळातच आठवडय़ातून मंगळवार व शुक्रवार हे दोन दिवस कार्यालय चालू असते. त्यातही अधिकारी व कर्मचारी मोजणीसाठी बाहेर गावी गेले असल्याचा फलक पाहून नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. अधिकाऱयांअभावी नागरिकांची कामे प्रलंबित राहत आहेत. ही बाब नागरिकांच्या हक्कांवर गदा आणणारी असून, प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
Comments are closed.