सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; सरकारविरोधात जोरदार घोषणा
सुवर्ण स्त्री: NEET परीक्षा पेपरफुटी संदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत उपोषणाला बसलेले ज्येष्ठ समाजसुधारक, पर्यावरण कार्यकर्ते व पद्मश्री पुरस्कार विजेते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला कोल्हापूरच्या ‘गोकुळ कामगार संघटने’च्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. या पार्श्वभूमीवर गोकुळ दूध संघाचे मुख्य कार्यालय (ताराबाई पार्क) आणि शिरोली येथील हेड ऑफिसच्या गेटवर कामगारांची जाहीर ‘गेट मीटिंग’ घेऊन केंद्र सरकारच्या उदासीन भूमिकेचा तीव्र निषेध करण्यात आला. सोनम वांगचुक गेल्या 19 दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे अनिश्चित कालीन उपोषणास बसले आहेत. देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या नीट परीक्षेतील गैरव्यवहाराची जबाबदारी स्वीकारून शिक्षण मंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी त्यांची मुख्य मागणी आहे. मात्र, केंद्र सरकार या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कामगार संघटनेने केला.
केंद्र सरकारची भूमिका लोकशाहीला मारक
याप्रसंगी बोलताना संघटनेचे जनरल सेक्रेटरी शाहीर निकम म्हणाले, “संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार देशामध्ये विविध ज्वलंत प्रश्नांवर शांततापूर्ण मार्गाने आंदोलने सुरू आहेत. मात्र, केंद्रातील सरकार आंदोलनकर्त्यांची साधी विचारपूस देखील करत नाही, ही अत्यंत खेदजनक आणि लोकशाहीला मारक अशी गोष्ट आहे.”
23 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येनंतरही सरकार ढिम्म
यावेळी बोलताना संघटनेचे पदाधिकारी शहाजी भोसले यांनी सरकारवर तोफ डागली. “नीट परीक्षेतील घोळामुळे मनस्ताप सहन करावा लागल्याने देशातील तब्बल 23 हून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एवढी मोठी जिवितहानी होऊनही केंद्र सरकार हा विषय गांभीर्याने घेत नाही,” असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेचा तीव्र निषेध केला.
गेटवर घोषणाबाजीतून उमटला तीव्र संताप
या गेट मीटिंग दरम्यान गोकुळच्या दोन्ही कार्यालयांच्या मुख्य प्रवेशद्वारावर सर्व कामगार मोठ्या संख्येने एकत्र आले होते. यावेळी कामगारांनी “संविधान जिंदाबाद…”, “सोनम वांगचुक आगे बढो, हम तुम्हारे साथ है…”, आणि “केंद्रीय शिक्षण मंत्री राजीनामा द्या…” अशा गगनभेदी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात व गेट मीटिंगमध्ये गोकुळ कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी शाहीर निकम, अध्यक्ष मल्हार पाटील, अशोक पुणेकर, निवास पाटील, व्ही. डी. पाटील, लक्ष्मण पाटील, दत्ता बच्चे, शहाजी राजे भोसले, योगेश चव्हाण, संभाजी शेलार यांच्यासह संघटनेचे सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि गोकुळ दूध संघाचे कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Comments are closed.