फुटबॉलवेड्या अमेरिकेत चौकार-षटकारांची आतषबाजी; वॉशिंगटन फ्रीडमने पंजाब किंग्जचा विक्रम मोडला
फुटबॉलवेड्या अमेरिकेत सध्या क्रिकेटचा धमाका सुरू आहे. ‘मेजर लीग क्रिकेट’ (MLC) मध्ये चौकार-षटकारांच्या आतषबाजीची मजा सध्या अमेरिकन्स घेत आहेत. एलिमिनेटर सामन्यांचा थरार सुरू आहे. दरम्यान, एमआय न्यूयॉर्क आणि वॉशिंगटन फ्रीडम यांच्यामध्ये डोळ्यांच पारण फेडणारी ऐतिहासिक लढत पाहायला मिळाली. या सामन्यात टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील अनेक मोठे विक्रम मोडित निघाले. दोन्ही संघांच्या फलंदाजांनी तोडफोड अंदाजात फलंदाजी करत चौकार-षटकारांच्या आतषबाजीसह धावांचा पाऊस पाडला.
एमआय न्यूयॉर्कने दिलेले 266 धावांचे आव्हान वॉशिंग्टन फ्रीडमने अगदी सहज 18.4 षटकांमध्ये पार करत क्रीडा प्रेमींना जबर धक्का दिला. या आव्हानाचा पाठलाग करत वॉशिंगटन फ्रीडम संघाने टी-20क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. या सामन्याचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे, टी-20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच सामन्यात तब्बल तीन फलंदाजांनी शतके झळकावण्याची अभूतपूर्व कामगिरी केली.
एमआय न्यूयॉर्कने कर्णधार निकोलस पूरनच्या 106 धावांच्या शतकीय खेळीच्या जोरावर 266 धावा केल्या होत्या. या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना वॉशिंग्टन फ्रीडमची सुरुवात अत्यंत खराब झाली आणि अवघ्या 10 धावांवर त्यांचे 2 गडी बाद झाले. परंतु, त्यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि अँड्रीज गॉस यांनी मिळून तिसऱ्या विकेटसाठी अवघ्या 89 चेंडूंत तब्बल 241 धावांची नाबाद भागीदारी रचून सामना पूर्णपणे एकतर्फी केला. स्मिथने नाबाद 110 धावांची खेळी केली, तर गॉसने 132 धावा कुटल्या. यासह वॉशिंग्टन फ्रीडमने 267 धावांचा यशस्वी पाठलाग करून आयपीएलमधील पंजाब किंग्सचा (265 धावा विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स) विक्रम मोडला आणि टी-20 इतिहासातील सर्वात मोठा यशस्वी पाठलाग नोंदवला.
या सामन्यातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे वॉशिंग्टन फ्रीडमचा फलंदाज अँड्रीज गॉस याने नोंदवलेला वैयक्तिक विक्रम होय. आतापर्यंत मेजर लीग क्रिकेटमध्ये परदेशी खेळाडूंचेच वर्चस्व पाहायला मिळत होते, परंतु गॉसच्या रूपाने आता यजमान देश अमेरिकेच्या एका स्थानिक खेळाडूचे नाव या सुवर्ण इतिहासात जोडले गेले आहे. गॉस हा ‘एमएलसी’मध्ये शतक ठोकणारा पहिला अमेरिकन खेळाडू ठरला आहे. त्याने अवघ्या 51 चेंडूंत 10 चौकार आणि 12 उत्तुंग षटकारांच्या मदतीने 132 धावांची वादळी खेळी करत अमेरिकन क्रिकेटसाठी एक नवा इतिहास रचला.
Comments are closed.