गुजरात टायटन्सच्या खेळाडूंची मध्यरात्री पळापळ, कोण झाडीत तर कोण रोडवर…; 37 सेकंदाचा धडकी भरवण

गुजरात टायटन्स बसला आग आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात पराभवाचा धक्का बसल्यानंतर काही तासांतच गुजरात टायटन्सच्या संघावर आणखी एक संकट कोसळले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून अंतिम फेरीत पराभव स्वीकारल्यानंतर संघ हॉटेलकडे परतत असताना त्यांच्या बसला अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचा 37 सेकंदांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये खेळाडू जीव वाचवण्यासाठी बसमधून बाहेर पडताना आणि रस्त्याच्या कडेला धावताना दिसत आहेत. या घटनेमुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सुदैवाने सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला वेळेत बसमधून बाहेर काढण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.

गुजरात टायटन्सच्या खेळाडूंची मध्यरात्री पळापळ (Gujarat Titans Bus Fire News)

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर गुजरात टायटन्सचा संघ हॉटेलकडे रवाना झाला होता. मात्र, प्रवासादरम्यान बसमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाले आणि काही क्षणांतच धुराचे लोट बाहेर येऊ लागले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत चालकाने तातडीने बस थांबवली.

बस थांबताच खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला त्वरित खाली उतरवण्यात आले. काही खेळाडू रस्त्याच्या कडेला उभे राहिले, तर काहींनी सुरक्षिततेसाठी झाडाझुडपांच्या दिशेने फिरताना व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. काही क्षणांसाठी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने सर्वांना वेळेत बाहेर काढण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.

थोडक्यात टळली मोठी दुर्घटना, सर्व खेळाडू सुरक्षित (Gujarat Titans Bus Fire News)

आग लागल्यानंतर संघातील सदस्यांना जवळपास एक तास रस्त्यावरच थांबावे लागले. त्यानंतर प्रशासन आणि संघ व्यवस्थापनाने पर्यायी वाहनांची व्यवस्था केली. सर्व खेळाडूंना आणि स्टाफ सदस्यांना सुरक्षितपणे हॉटेलमध्ये पोहोचवण्यात आले.

गुजरात टायटन्ससाठी ही रात्र अत्यंत वेदनादायी ठरली. एका बाजूला आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले, तर दुसऱ्या बाजूला बसला आग लागल्याने संघाच्या अडचणींमध्ये भर पडली. विशेष म्हणजे, फायनलपूर्वी संघ सततच्या प्रवासामुळेही थकलेला होता. धर्मशाला, मुल्लांपूर आणि अहमदाबाद असा व्यस्त दौरा, तसेच खराब हवामानामुळे झालेला विलंब यामुळे खेळाडूंवर अतिरिक्त ताण निर्माण झाला होता.

दरम्यान, बसला आग लागण्याचे प्राथमिक कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगितले जात आहे. संबंधित यंत्रणांनी तपास सुरू केला असून घटनेची सखोल चौकशी केली जाणार आहे. मात्र, या संपूर्ण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व खेळाडू आणि स्टाफ सुरक्षित आहे.

हे ही वाचा –

Gujarat Titans Team Bus News : खेळाडूंनी भरलेल्या गुजरात टायटन्सच्या टीम बसला आग; गिल, बटलरपासून सगळ्यांना काढलं बाहेर, फायनलनंतर हादरवणारी घटना

आणखी वाचा

Comments are closed.