'नाव सिराज म्हणूनच संघात स्थान मिळालं नाही'; सिराजला पहिल्या सामन्यात स्थान न मिळाल्याने क्रिकेटविश्वात मोठी खळबळ!
सध्या टीम इंडिया आणि न्युझीलंड दोन्ही संघात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. (Test Series between india vs new zealand) यामध्येच एक विषय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. पहिल्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये मोहम्मद सिराजला (Mohmmed Siraj) स्थान न दिल्याने काँग्रेसचे खासदार इम्रान मसूद यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, धर्माच्या आधारावर भेदभाव केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
यावर टोला लगावताना ते म्हणाले की, ‘नाव सिराज आहे, हेच काय कमी आहे?’ सिराजला संघात स्थान न मिळाल्याने क्रिकेटविश्वातूनही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वसीम जाफर, आकाश चोप्रा, सुनील गावस्कर आणि रवी शास्त्री यांसारख्या दिग्गजांनीही या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
रिपोर्ट्सनुसार इम्रान मसूद म्हणाले, चांगली कामगिरी करूनही त्याला संघात स्थान दिले गेले नाही, असे सांगितले जात आहे. त्याचे नाव सिराज आहे आणि कदाचित याच कारणामुळे त्याला संघात स्थान मिळाले नसावे. चांगली कामगिरी करूनही त्याची निवड होत नसेल, तर हा स्पष्टपणे भेदभाव आहे.
मोहम्मद सिराज हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 च्या चक्रात भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याने 11 सामन्यांतील 21 डावांमध्ये 43 विकेट्स घेतल्या आहेत. गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर पाचही कसोटी सामने खेळणारा तो भारताचा एकमेव वेगवान गोलंदाज होता. त्यामुळे वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याला संधी न दिल्याने अनेक दिग्गजांना आश्चर्य वाटले.
रवी शास्त्री (Ravi shastri on Mohmmed Siraj) यांनीही सिराजला संघात स्थान न दिल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले. त्यांनी आपल्या ‘एक्स’ अकाउंटवर लिहिले, जर वेग, कौशल्य आणि चेंडू स्विंग करण्याची क्षमता हे निवडीचे निकष असतील आणि ताशी 140 किलोमीटर वेगाने गोलंदाजी करणे कठीण असेल, तर हा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो की मोहम्मद सिराज कुठे होता? त्याच्याकडे अनुभव आहे, आक्रमकता आहे आणि चेंडूने काहीतरी खास करण्याची क्षमता आहे. या गोष्टींनाही महत्त्व दिले पाहिजे.
वेलिंग्टन कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जसप्रीत बुमराहच्या शानदार गोलंदाजीमुळे न्यूझीलंडचे अवघ्या 70 धावांत 5 फलंदाज बाद झाले. आकाश दीप आणि अंशुल कंबोज यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली. मात्र, प्रसिद्ध कृष्णाला प्रभावी गोलंदाजी करता आली नाही.
दरम्यान, पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर फलंदाजीचे प्रशिक्षक सितांशू कोटक (Sitanshu Kotak) यांनी प्रसिद्ध कृष्णाची बाजू घेतली. ते म्हणाले की, कृष्णा हा आक्रमक गोलंदाज आहे आणि त्यामुळे त्याच्या गोलंदाजीवर धावा जाऊ शकतात. तसेच, सिराजला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्याच्या निर्णयाबाबत बोलताना त्यांनी सिराजला बाहेर बसवणे हा चुकीचा निर्णय होता, असे आपल्याला वाटत नसल्याचे स्पष्ट केले.
Comments are closed.