2027 च्या हंगामापूर्वी डीसीमध्ये मोठे बदल, महेला जयवर्धनेवर सोपवली मोठी जबाबदारी
दिल्ली कॅपिटल्सने श्रीलंकेचा माजी दिग्गज फलंदाज महेला जयवर्धने याच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. जयवर्धनेची महिला प्रीमियर लीग अर्थात WPL २०२७ साठी क्रिकेट संचालक (Director of Cricket) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. फ्रँचायझीने सोशल मीडियावर अधिकृत घोषणा करून ही माहिती शेअर केली. तो २०२६ च्या आयपीएलपर्यंत मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) होता. हंगाम संपल्यानंतर त्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
आता तो आपल्या नवीन भूमिकेत दिल्ली कॅपिटल्सच्या महिला संघाच्या क्रिकेटशी संबंधित कामकाजावर देखरेख ठेवेल. जयवर्धनेचे दिल्लीशी जोडले जाणे खूप फायदेशीर ठरू शकते. त्याच्या कार्यकाळात मुंबईने तीन आयपीएल जेतेपदे जिंकली आहेत. त्यामुळे दिल्लीसाठी त्याचा हा अनुभव उपयुक्त ठरू शकतो.
संचालक बनल्यानंतर महेला जयवर्धने म्हणाला, “दिल्ली कॅपिटल्सकडे एक मजबूत ओळख आणि महिला क्रिकेटसाठी उत्साहवर्धक दृष्टिकोन आहे. आपण एकत्र मिळून काय करू शकतो, याबद्दल मी खूप उत्सुक आहे.”
जेमिमा रॉड्रिग्जच्या नेतृत्वाखाली दिल्लीने गेल्या हंगामातील महिला प्रीमियर लीगमध्ये अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला होता. संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध जेतेपदाचा सामना खेळला होता, ज्यात त्यांना पराभवासह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. बंगळुरूने ६ गडी राखून विजय मिळवत जेतेपद आपल्या नावावर केले.
महिला प्रीमियर लीगमध्येही दिल्ली कॅपिटल्सने अद्याप एकही जेतेपद जिंकलेले नाही. परंतु विशेष बाब म्हणजे, दिल्लीने प्रत्येक वेळी अंतिम फेरीत पोहोचून उपविजेतेपद मिळवले आहे. २०२३ ते २०२६ दरम्यान या स्पर्धेचे ४ हंगाम खेळवले गेले आहेत. प्रत्येक वेळी दिल्लीने अंतिम फेरीत धडक मारली आहे.
२०२३ च्या पहिल्या हंगामात दिल्लीला अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्करावा लागला होता. २०२४ च्या दुसऱ्या हंगामात दिल्लीच्या संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध जेतेपदाचा सामना गमावला. २०२५ मध्ये दिल्लीने अंतिम सामना पुन्हा मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळला आणि संघ पराभूत झाला. २०२६ च्या हंगामात दिल्लीने अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध खेळला, येथेही दिल्लीला पराभवाचा सामना करावा लागला.
Comments are closed.