अंध क्रिकेट आशिया कप स्पर्धेत अंतिम सामन्यात पाकिस्तानचा रडीचा डाव, हिंदुस्थानचा बक्षीस वितरणावर बहिष्कार
बांगलादेशातील ढाका येथे पुरुषांच्या अंध क्रिकेट आशिया कप 2026 चा अंतिम सामना हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यामध्ये खेळला जाणार होता. मात्र, पावसाच्या व्यत्ययामुळे सामना होऊ शकला नाही. यापूर्वी अशी परिस्थिती निर्माण झाल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित करण्यात येत असे. मात्र, यंदा रन रेटच्या आधारे पाकिस्तानला विजेते घोषित करण्यात आलं. या निर्णयाविरोधात हिंदुस्थानच्या संघाने आक्रमक भूमिका घेत बक्षीस वितरण सोहळ्यावर बहिष्कार टाकला आणि क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाईंड इन इंडिया’ (CABI) ने या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला आहे. तसेच हिंदुस्थानचा कर्णधार टी.दुर्गा राव यानेही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.
कॅबीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ‘वर्ल्ड ब्लाईंड क्रिकेट कौन्सिल’च्या (WBCC) तांत्रिक समितीने सुरुवातीला दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित करण्यास सहमती दर्शवली होती. मात्र, तांत्रिक समितीचे संचालक आणि पाकिस्तान ब्लाईंड क्रिकेट कौन्सिलचे (PBCC) अध्यक्ष सुलतान शाह यांनी पदाचा प्रभाव वापरून तांत्रिक समितीचा निर्णय बदलण्यास भाग पाडले आणि मॅच रेफरी व पंचांवर दबाव आणून पाकिस्तानच्या बाजूने निर्णय घेतला, असा गंभीर आरोप कॅबीने केला आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा निकाल फिरवण्याचा हा अस्वीकार्य प्रयत्न असून यामुळे निर्णय प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर आणि निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे कॅबीने म्हटले आहे. NDTV ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
कॅबीने जारी केलेल्या व्हिडिओमध्ये टीम इंडियाचा कर्णधार टी. दुर्गा राव यानेही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. “अंतिम सामन्यावेळी रेफरींनी आम्हाला बोलावून रन रेटच्या आधारे पाकिस्तानला विजेते आणि आम्हाला उपविजेते घोषित करत असल्याचे सांगितले. आम्ही याला विरोध केला, कारण असे यापूर्वी कधीही घडलेले नाही. अशा वेळी नेहमी दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित केले जाते. हा पूर्णपणे नियमांच्या विरोधात घेतलेला निर्णय असून आम्ही याच गोष्टीचा विरोध करत आहोत,” असे दुर्गा राव यांनी स्पष्ट केले.
Comments are closed.