पावसाच्या लहरीपणाचा फटका, वाडा कोलमलाही फटका; उत्पादन ४० टक्क्यांनी घटले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पचनाला हलका, सुगंधी आणि भौगोलिक मानांकनाचा तुरा मिळवलेल्या वाडा कोलमलाही दुष्काळाचा जबरदस्त फटका बसला आहे. यंदा पावसाने दडी मारल्याने वाडा कोलमचे उत्पादन तब्बल ४० टक्क्यांनी घटले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले असून ७० ते ८० रुपये किलोला मिळणारा हा तांदूळ आता चांगलाच ‘भाव’ खाणार आहे.

वाडा तालुक्यात यंदा १३ हजार ९४० क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात आली होती. त्यापैकी २ हजार हेक्टर क्षेत्रावर वाडा कोलम, तर ५ हजार हेक्टर क्षेत्रावर हलव्या भाताची लागवड झाली होती. सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने भातशेतीची स्थिती समाधानकारक होती. मात्र भात कापणीचा हंगाम जवळ येत असतानाच पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे पाण्याअभावी भाताची पिके करपली. विशेषतः गरव्या भातशेतीचे ४० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. त्यातील हळव्या भातशेतीचे नुकसान जास्त प्रमाणात झालेले नाही.

> गरवा भातशेतीचे नुकसान झाले असून उत्पादनात मोठी घट झाली आहे. मात्र हळव्या भातशेतीतील पीक शेतकऱ्यांच्या हाती आले आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
हरेश माकर, तालुका कृषी अधिकारी, वाडा

शेतकरी अडचणीत

वाडा कोलम तांदळाला मुंबईसह राज्यातील बाजारपेठांमध्ये मोठी मागणी आहे. मात्र यंदा उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात तांदूळ विक्रीसाठी उपलब्ध करता येणार नाही. या परिस्थितीचा फायदा घेऊन बाहेरील राज्यातील तांदूळ वाडा कोलमच्या नावाने विकला जाण्याची शक्यता आहे. आधीच मजुरांची कमतरता, शेतीची अवजारे, बियाणे, खते आणि औषधांच्या वाढत्या किमती यामुळे शेतकरी अडचणीत आहेत.

Comments are closed.