एसटीच्या एनसीएमसी कार्डसाठी…बेटिंग अॅप घोटाळय़ातील कंपनीचे कंत्राट रद्द करा! शिवसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

देशभर गाजलेल्या बेटिंग अॅप घोटाळय़ातील मुख्य आरोपी विकास गर्गच्या ‘एबिक्स’ कंपनीला एसटीच्या एनसीएमसी कार्डचे कंत्राट देणे अत्यंत धक्कादायक व गंभीर बाब आहे. संबंधित संशयास्पद कंपनीचे कंत्राट तातडीने रद्द करून एनसीएमसी कार्डमधील संचित मूल्याची रक्कम थेट एसटी महामंडळाच्या खात्यात जमा करा, अशी मागणी शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

राज्यात आतापर्यंत 1.47 कोटींहून अधिक प्रवाशांनी एनसीएमसी कार्डची नोंदणी केली असून त्यापैकी 1.29 कोटी कार्ड सक्रिय आहेत. भविष्यात राज्यातील अंदाजे 5 ते 6 कोटी सवलतधारक प्रवाशांनी प्रत्येकी किमान 500 रुपये कार्डमध्ये शिल्लक ठेवले तरी हा निधी अंदाजे 2,500 कोटींच्या घरात जाईल. बेटिंग अॅप घोटाळय़ाशी नाव जोडले गेलेल्या गर्गच्या पंपनीकडे प्रचंड रकमेचे संचित मूल्य जमा होणे अत्यंत धोकादायक असून हा निधी थेट एसटी महामंडळाच्या अधिपृत बँक खात्यात जमा करावा, अशी मागणी खासदार सावंत यांनी केली आहे.

एसटीचे मोठे आर्थिक नुकसान

एनसीएमसी कार्डमध्ये भरलेल्या पैशांची नैतिक जबाबदारी महामंडळावर येत आहे. मात्र कोटय़वधी रुपयांच्या संचित निधीचा प्रत्यक्ष लाभ वादग्रस्त खासगी संस्थेला मिळत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे. महामंडळाने प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेत रिचार्जवरील एजंट कमिशन रद्द करण्याचा तसेच किमान रिचार्जची मर्यादा 50 रुपयांवरून पाच रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुधारणा केवळ वरवरची मलमपट्टी आहे. या योजनेतील मूळ आणि अत्यंत गंभीर धोका अद्यापही कायम आहे याकडे सावंत यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

Comments are closed.