अधिवेशन काळात सभागृहात सचिवांची उपस्थिती अनिवार्य, संसदीय कार्य विभागाकडून आदेश जारी
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होत आहे. अधिवेशन सुरू असताना सभागृहात सचिव दर्जाचे अधिकारी उपस्थित नसतात अशा प्रत्येकवेळी तक्रारी असतात. त्याची गंभीर दखल घेत संसदीय कार्य विभागाकडून आज आदेश जारी करण्यात आले. कामकाज सुरू असताना अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, अवर सचिवांनी सभागृहात उपस्थित राहणे अनिवार्य आहे, अशी तंबी देण्यात आली आहे.
संसदीय कार्य विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, अधिवेशनादरम्यान प्रशासकीय कामकाजाला सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. विधानसभा आणि विधान परिषदेतील महत्त्वाच्या चर्चा, मागण्या, प्रस्ताव यावेळी सचिवांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे. तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहतील याची काळजी घेतली पाहिजे.
कोणत्याही अपरिहार्य कारणास्तव नागपूरच्या बाहेर जावे लागले तर त्यासाठी मुख्य सचिव आणि संबंधित विभागाच्या मंत्र्यांची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. तसेच आपल्या गैरहजेरीत काम सांभाळायला जबाबदार अधिकारी नेमावा लागेल. आमदारांच्या प्रश्नांची उत्तरे ठराविक वेळेत विधिमंडळ सचिवालयाला पाठवावी लागतील, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
Comments are closed.