सोसायटीतील झाडे नष्ट करणाऱ्या विकासकांवर गुन्हा दाखल करा! पर्यावरणप्रेमीची महापालिकेकडे मागणी
भायखळा येथील एका विकासकाने महापालिकेच्या भोगवटा प्रमाणपत्रासाठी दिलेल्या परवानगीचे उल्लंघन करत भूखंडावरील झाडे नष्ट केल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी रमेश सावंत यांनी केला आहे. त्यामुळे अशा विकासकांवर वचक बसणे गरजेचे असून प्रशासनाने दोषी विकासकांवर कलम 8 सह 21 अन्वये गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी महापालिकेकडे केली आहे.
भायखळय़ाच्या दि न्यू ग्रेट इस्टेट मिल पंपाऊंड आवारातील गुड टाइम्स रियल इस्टेट डेव्हलपमेंट विकासकाला महापालिकेने भोगवटा प्रमाणपत्र देताना 5 झाडे कापणे, 214 झाडांचे पुनर्रोपण आणि 62 झाडे तसेच ठेवण्याची परवानगी दिली होती. मात्र रमेश सावंत यांच्या आरोपानुसार विकासकाने तेथील झाडे नष्ट करत महापालिकेची फसवणूक केली आहे. विकासकाने 214 झाडांचे पुनर्रोपण केले नसून तेथे 62 पैकी फक्त 32 झाडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार सावंत यांनी विकासकाविरोधात तक्रार दाखल केली. या मागणीनंतर महापालिकेने पाहणी केली असता भूखंडावर अभिलेखानुसार आवश्यक असणारी 77 जुनी झाडे व 33 लहान झाडे कमी असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार प्रशासनाने विकासक व सालसेट सोसायटीला नोटीस बजावत कारवाईचा इशारा दिला होता.
सखोल तपास करण्याच्या सूचना
महापालिकेला विकासक व सोसायटीकडून या दोघांकडून कोणतेही उत्तर न मिळाल्याने पालिकेच्या सहाय्यक उद्यान अधीक्षक ई विभागाने भायखळा पोलिसांना या प्रकरणाचा सखोल तपास करून कलम 8 सह 21 अन्वये कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना लेखी पत्राद्वारे केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
Comments are closed.