3500 एकर मोक्याच्या जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्यापासून रोखा; एसटी कर्मचाऱ्यांचे 10 डिसेंबरला आंदोलन, खासगीकरणाविरोधात संयुक्त कृती समितीचा एल्गार

एसटी महामंडळाच्या मोक्याच्या जमिनी वाचवण्यासाठी एसटी कर्मचाऱयांनीच आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. ‘पीपीपी’च्या नावाखाली एसटीच्या जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्यापासून रोखा, ‘पीपीपी’चा निर्णय रद्द करा आदी प्रमुख मागण्यांसह कर्मचाऱयांच्या संयुक्त कृती समितीने एल्गार पुकारला असून10 डिसेंबरला राज्यभरात धरणे आंदोलन केले जाणार आहे. याचा एसटीच्या प्रवासी सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

एसटीच्या 3500 एकर मोक्याच्या जमिनी 99 वर्षांच्या कराराने बिल्डरांच्या घशात घालण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याविरोधात महाराष्ट्र एसटी कामगार सेना, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक), कास्ट्राईब रा. प. कर्मचारी संघटना, शिव परिवहन वाहतूक व कामगार सेना, महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन, महाराष्ट्र एसटी कामगार काँग्रेस, राष्ट्रीय एसटी कामगार काँग्रेस, मागासवर्गीय अधिकारी व पर्यवेक्षक वेल्फेअर असोसिएशन या कामगार संघटना एकवटल्या आहेत. या संघटनांच्या संयुक्त कृती समितीने शुक्रवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन देऊन आंदोलन जाहीर केले.

कृती समितीच्या प्रमुख मागण्या

एसटीच्या 3,500 एकर मोक्याच्या जमिनी 99 वर्षांच्या ‘पीपीपी’ तत्त्वावर बिल्डरांना देण्याचा निर्णय रद्द करून महामंडळाने स्वतःहून जागा विकसित कराव्यात.

5,150 ई-बसेस खाजगी कंत्राटदारांकडून भाडेतत्त्वावर घेण्याचे धोरण रद्द करावे आणि महामंडळाने स्वःमालकीच्या  इलेक्ट्रिक बस खरेदी कराव्यात.

चालक व तांत्रिक कर्मचाऱयांची कंत्राटी नोकरभरती न करता नियमित नोकरभरतीला परवानगी द्यावी.

राज्याची जीवनवाहिनी असलेल्या एसटीचे आणि एसटी कर्मचाऱयांचे अस्तित्व व भविष्य अबाधित ठेवण्यासाठी योग्य तो निर्णय घेण्याबाबत परिवहन मंत्र्यांनी लवकरात लवकर बैठकीचे आयोजन करावे. कृती समितीच्या मागण्यांबाबत सकारात्मक दृष्टिकोनातून निर्णय घ्यावा.

– हिरेन रेडकर, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कामगार सेना

Comments are closed.