VIDEO: सामन्याचे आमंत्रण न दिल्याचा राग, पठ्ठ्याने चालू सामन्यातच खेळपट्टीवर फिरवला नांगर

भारतात क्रिकेट सर्वात लोकप्रिय आहे, मात्र मैदानात कधी कधी वादही होतात आणि ते वाद इतके वाढतात की लोक रागाच्या भरात काय करतील सांगता येत नाही. अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यातील क्रिकेट स्पर्धेदरम्यान घडली. आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यावेळी एका तरुणाने संपूर्ण खेळपट्टीवर नांगर फिरवला.

ही घटना धरणगावात घडली. तेथे आमदार चषकाचा अंतिम सामना रंगात आला होता. खेळाडू विजयासाठी प्रयत्न करत होते आणि प्रेक्षक त्यांना जल्लोष करत दाद देत होते. अशाचवेळी कोणाच्याही काही लक्षात येण्याच्या आत एक व्यक्ती अचानक ट्रॅक्टर घेऊन मैदानावर आला आणि त्याने खेळपट्टीच्या बरोबर मध्यभागी उकरण्यास सुरूवात केली. त्याने काही मिनिटांतच संपूर्ण खेळपट्टी उकरली.

त्या व्यक्तिमुळे खेळपट्टीचे मोठे नुकसान झाले आणि सामना पुन्हा सुरू करणे शक्य झाले नाही. त्यामुळे आयोजकांना सामना रद्द करावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, त्या भव्य क्रिकेट स्पर्धेसाठी स्थानिक स्तरावरील एका राजकिय पदाधिकाऱ्याला आमंत्रित करण्यात आले नाही. यामुळे अपमान झाल्याचे त्यांना वाटले आणि त्या पदाधिकाऱ्याच्या कट्टर समर्थकाने हे टोकाचे पाऊल उचलले. त्याच्या या कृतीमुळे स्थानिक रहिवासी तीव्र संतप्त झाले. तसेच या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

रात्रंदिवस मेहनत करून तयार केलेल्या त्या खेळपट्टीचे झालेले नुकसान पाहून खेळाडूंनी संताप व्यक्त केला. त्या घटनेनंतर मैदानात खेळाडू आणि तो ट्रॅक्टर आणणाऱ्या गटांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाली. तसेच या घटनेमुळे स्थानिक स्पर्धांमध्ये अधिक सुरक्षा आणि योग्य आयोजन व्यवस्थापनाच्या चर्चा सुरू झाल्या.

Comments are closed.