IND Vs NZ 1st Test – जसप्रीत बुमराहचा असाही पराक्रम; झहीर खानसह एस. श्रीसंत यांच्या विशेष पंगतीत मिळवलं स्थान

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

टीम इंडियाचा मुख्य गोलंदाज जसप्रीत बुमराह न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीमध्ये दमदार कामगिरी करत आहे. याच कामगिरीच्या जोरावर त्याने टीम इंडियाचे माजी गोलंदाज झहीर खान आणि एस. श्रीसंत यांच्या विशेष पंगतीत स्थान मिळवलं आहे. विशेष म्हणजे 2007 नंतर प्रथमच हिंदुस्थानच्या एखाद्या गोलंदाजांने अशी ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली आहे.

जसप्रीत बुमराहने सामन्याच्या दोन्ही डावात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमला आल्यापावली तंबूत धाडण्याचा पराक्रम केला आहे. पहिल्या डावात लॅथम दोन चेंडू खेळून त्रिफळाचीत झाला. दुसऱ्या डावातही बुमराहने या कामगिरीची पुनरावृत्ती करत डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर लॅथमला यष्टिरक्षक ऋषभ पंतकरवी झेलबाद केले. दोन्ही डावांत खाते न उघडता बाद झाल्यामुळे टॉम लॅथमच्या नावावर ‘पेअर’ची (दोन्ही डावांत शून्य) नोंद झाली आहे. कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांच्या पहिल्या षटकात बळी घेणारा बुमराह हा केवळ तिसरा हिंदुस्थानी गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी 2006 मध्ये किंग्स्टन येथे श्रीसंतने वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलला, तर 2007 मध्ये मीरपूर येथे झहीर खानने बांगलादेशच्या जावेद ओमरला दोन्ही डावांच्या पहिल्याच षटकात बाद केले होते.

दरम्यान, या सामन्यात टीम इंडियाने आपली पकड अत्यंत मजबूत केली असून तिसऱ्या दिवसाअखेर न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 2 बाद 119 धावा केल्या असल्या तरी ते अजूनही 233 धावांनी पिछाडीवर आहेत. तत्पूर्वी, केएल राहुल (136) आणि ऋषभ पंत (128) यांची शतके तसेच शुभमन गिल (98), यशस्वी जयसवाल (85), देवदत्त पडिक्कल (80) आणि ध्रुव जुरेल (78) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 9 बाद 720 धावांवर पहिला डाव घोषित करत न्यूझीलंडच्या भूमीवरची सर्वोच्च कसोटी धावसंख्या उभारली. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा डेव्हॉन कॉनवे 59 आणि रचिन रवींद्र 27 धावांवर नाबाद होते.

Comments are closed.