हिंदुस्थानचे दुसऱ्या दिवसावर वर्चस्व; न्यूझीलंडचा डाव 368 धावांत आटोपला, यशस्वी आणि राहुल यांची दमदार सलामी
हिंदुस्थानने पहिल्या दिवशी वर्चस्वाची संधी गमावली असली तरी दुसऱ्या दिवशी मात्र त्यांनी दमदार खेळ केला. हिंदुस्थानच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत न्यूझीलंडचा डाव 368 धावांत आटोपला. त्यानंतर यशस्वी जैसवाल आणि लोकेश राहुल यांनी 130 धावांची दमदार सलामी दिली आणि त्यामुळेच हिंदुस्थानचे दुसऱ्या दिवसावर वर्चस्व पाहायला मिळाले. हिंदुस्थान अजूनही 209 धावांनी पिछाडी असून ते तिसऱ्या दिवशी आघाडी घेणार का, याची उत्सुकता आता सर्वांना लागलेली असणार आहे.
न्यूझीलंडचा पहिला डाव आटोपला
न्यूझीलंडने 5 बाद 243 धावांवरून दुसऱ्या दिवसाची सुरुवात केली, हेन्री निकोल्सने गोलंदाजांचा धैर्याने सामना करत 21 चौकारांसह 175 धावा केल्या. निकोल्सने पहिल्या दिवशी आपले शतक पूर्ण केले आणि दुसऱ्या दिवशीही आपली प्रभावी फलंदाजी सुरू ठेवली. ग्लेन फिलिप्सने 216 चेंडूंमध्ये 14 चौकारांसह 118 धावा केल्या. या दोघांनी 394 चेंडूंमध्ये 216 धावांची भागीदारी केली. दुसऱ्या दिवशी आकाश दीपने फिलिप्सला त्रिफळाचीत केले. फिलिप्सची विकेट ही आज हिंदुस्थानची दिवसातील पहिली विकेट होती. त्यानंतर प्रसिध कृष्णाने नॅथन स्मिथला (14) पायचीत केले. त्यानंतर आकाश दीपने काईल जेमिसनला 11 धावांवर के. एल. राहुलकरवी झेलबाद केले. बुमराहने मॅट हेन्रीला (1) बाद करून आपली चौथी विकेट घेतली, तर अंशुल कंबोजने जेकब डफीला (4) बाद करून न्यूझीलंडचा डाव गुंडाळला.
यशस्वी-राहुलची शतकी भागीदारी
यशस्वी आणि राहुल यांनी संयमी सुरुवात केली. पहिल्या पाच षटकांमध्ये त्यांनी आपल्या बॅटला वेसण घातले होते, पण सेट झाल्यावर मात्र यशस्वी आणि राहुल यांनी दणक्यात फटकेबाजी करायला सुरुवात केली. यशस्वी यावेळी बिनधास्तपणे खेळत होता आणि त्याने आपले अर्धशतकही झळकावले. यशस्वीने 14 वे अर्धशतक झळकावले आणि तो शतकाच्या दिशेने कूच करायला लागला. पण शतकासाठी 15 धावांची गरज असताना तो बाद झाला आणि संघाला पहिला धक्का बसला. यशस्वीने 16 चौकारांच्या जोरावर 89 चेंडूंत 85 धावांची दमदार खेळी साकारली. यशस्वीने राहुलसोबत पहिल्या विकेटसाठी 130 धावांची भागीदारी केली. त्यानंतर राहुलने आपले 22 वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. राहुल आता नाबाद 52 धावांवर खेळत असून त्याला देवदत्त पडीक्कलची (खेळत आहे 16) चांगली साथ मिळत आहे.
के. एल. राहुलने रचला इतिहास
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी हिंदुस्थानचा सलामीवीर फलंदाज के. एल. राहुलने केवळ संयमी खेळीच केली नाही, तर एक ऐतिहासिक विक्रमही रचला. शुक्रवारी हिंदुस्थानच्या पहिल्या डावाची सुरुवात करताना राहुल दुसऱ्या दिवसाचा खेळ संपताना 52 धावांवर नाबाद राहिला. न्यूझीलंडच्या भूमीवर कसोटी क्रिकेटमधील राहुलची ही पहिलीच अर्धशतकी खेळी आहे. के. एल. राहुल हा दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या चारही आग्नेय आशियाई देशांमध्ये सलामीवीर म्हणून किमान एक अर्धशतक झळकावणारा पहिला हिंदुस्थानी फलंदाज ठरला आहे.
बुमराह आणि आकाश दीप यांची चमकदार कामगिरी
जसप्रीत बुमरा हिंदुस्थानसाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 29 षटकांत 92 धावा देऊन चार विकेट्स घेतले. आकाश दीपने 23 षटकांत 53 धावा देऊन तीन फलंदाजांना बाद केले. अंशुल कंबोजने 2, तर प्रसिध कृष्णाने 1 विकेट घेतली.
टीम डंडियाच्या दोन्ही सलामीवीरांचा खास विक्रम
राहुल आणि जैसवाल यांनी आणखी एक खास विक्रम प्रस्थापित केला. न्यूझीलंडच्या भूमीवर कसोटी डावात दोन्ही परदेशी सलामीवीरांनी 50 पेक्षा जास्त धावा करण्याची बऱ्याच काळानंतर ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी पाकिस्तानचे सलामीवीर फलंदाज सामी अस्लम आणि अझर अली यांनी 2016 मध्ये हॅमिल्टन कसोटीत ही कामगिरी केली होती.
Comments are closed.