ऑलिम्पिक निवडणुकीचा आखाडा तापला; मतदानाच्या हक्कावरून बॉक्सिंग महासंघाचा एल्गार, सरकारी हस्तक्षेपाच्या आरोपांनी आयओएत खळबळ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

देशासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकणाऱ्या खेळाडूंच्या क्रीडा महासंघांनाच हिंदुस्थानी ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) निवडणुकीत मतदानापासून दूर ठेवले जात असेल तर क्रीडा प्रशासनातील लोकशाही नेमकी कुणासाठी, असा संतप्त सवाल उपस्थित झाला आहे. बॉक्सिंग महासंघाला मतदानाचा अधिकार नाकारल्याने वादाचा भडका उडाला असतानाच निवडणूक प्रक्रियेत सरकारी हस्तक्षेप होत असल्याच्या आरोपांनी या निवडणुकीभोवती संशयाचे सावट अधिक गडद केले आहे. आता या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) निरीक्षक पाठवावा, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.

हिंदुस्थानी बॉक्सिंग महासंघाचे (बीएफआय) अध्यक्ष अजय सिंह यांनी मतदानाचा अधिकार नाकारल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने बीएफआयला मतदानाची परवानगी देण्याचे स्पष्ट निर्देश दिले असतानाही ‘आयओए’ने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा त्यांचा आरोप आहे. विशेष म्हणजे 2025 मध्ये बीएफआयचा मतदार यादीत समावेश होता. मग एका वर्षात असे काय बदलले की, बीएफआयला निवडणूक प्रक्रियेतून बाहेर ठेवण्यात आले, असा थेट सवाल सिंह यांनी उपस्थित केला. हिंदुस्थानी बॉक्सिंगने उल्लेखनीय यश मिळवले असताना त्याच खेळाच्या राष्ट्रीय महासंघाचा मतदानाचा आवाज दाबला जाणे अन्यायकारक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा

‘आयओए’ निवडणुकीचा वाद आता संघटनेच्या बाहेर गेला आहे. बॉक्सिंग महासंघाच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने आयओएचे निवडणूक अधिकारी संजय कुमार श्रीवास्तव यांना महासंघाच्या अधिकृत प्रतिनिधींना 20 नोव्हेंबर रोजी वैयक्तिक सुनावणी देण्याचे निर्देश दिले. महासंघाची 12 नोव्हेंबरची हरकत 23 नोव्हेंबरपर्यंत निकाली काढण्याचे आश्वासन न्यायालयासमोर देण्यात आले आहे. याच वादात टेबल टेनिस महासंघ आणि इंडियन गोल्फ युनियन यांनाही मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आले आहे. 30 राष्ट्रीय क्रीडा महासंघांचे 60 प्रतिनिधी आणि खेळाडू आयोगाचे प्रतिनिधी मिळून 71 सदस्यांची अंतिम मतदार यादी जाहीर झाली आहे, मात्र या यादीतून तीन महत्त्वाच्या महासंघांना वगळण्यात आल्याने निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Comments are closed.