आम्ही बाटलीच्या झाकणाने बॉल टॅम्परिंग करायचो, शोएब अख्तरच्या विधानाने खळबळ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

क्रिकेट विश्वात बॉल टॅम्परिंगच्या घटनांमुळे पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया हे दोन देश वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. याच वादात भर घालणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने बॉल टॅम्परिंग संदर्भात केलेल्या एका दाव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे पाकिस्तानी खेळाडूंवरच त्याने भाष्य केल्याने उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

अख्तरच्या मते, पाकिस्तानी खेळाडू खेळत असताना चेंडूशी छेडछाड करण्यासाठी सँडपेपरऐवजी बाटलीच्या झाकणांचा वापर करत असत आणि त्या काळात चेंडू बदलल्याच्या घटनाही घडत असत. विजडन Scoop वरील पॉडकास्टमध्ये बोलताना त्याने अशा घटनांचा फटका केवळ ऑस्ट्रेलियन क्रिकेटलाच नव्हे तर इतर संघांनाही बसल्याचे म्हटलं आहे. अख्तर याचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा 2018 च्या गाजलेल्या ‘सँडपेपर गेट’ प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटीदरम्यान ऑस्ट्रेलियन खेळाडू कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट सँडपेपरने चेंडूची स्थिती बदलण्याचा प्रयत्न करताना कॅमेऱ्यात कैद झाला होता.

या प्रकरणानंतर तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली होती. हा वाद आता उस्मान ख्वाजाच्या ‘सबर’ या आत्मचरित्रातील दाव्यांमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. 2018 च्या न्यूलँड्स कसोटीत चेंडूशी छेडछाड करण्याच्या योजनेची संपूर्ण संघाला माहिती होती, असा दावा ख्वाजाने केला आहे. हे विधान पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्क यांनी यापूर्वी केलेल्या विधानांच्या विरोधात आहे, कारण या तिन्ही खेळाडूंनी या प्रकाराची आधीपासून माहिती असल्याचा नकार दिला होता.

Comments are closed.