क्रीडानगरीतून – मेस्सी ठरला महागडा खेळाडू
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनल मेस्सीने पुन्हा एकदा आपल्या लोकप्रियतेची आणि ब्रॅण्ड व्हॅल्यूची प्रचीती दिली आहे. इंटर मियामी एफसी सोबत नव्या करारानंतर मेस्सीच्या मानधनात मोठी वाढ झाली असून तो आता मेजर लीग सॉकरमधील सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू ठरला आहे.
सोहम शहाणे आयपीएलचे मराठीत समालोचन करणार
नाशिकच्या सोहम शहाणे याने क्रिकेट विश्वात समालोचक म्हणून एनपीएल ते आयपीएलपर्यंत मोठी झेप घेतली आहे. आता तो जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आयपीएलसाठी मराठी समालोचनाची जबाबदारी सांभाळणार आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वतीने सर्वप्रथम समालोचक म्हणून सोहम शहाणे याला 15 वर्षांपूर्वी ‘एनपीएल’चे व्यासपीठ लाभले होते. त्याला वेळोवेळी प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले, ज्येष्ठ क्रिकेटपटू संदीप पाटील अशा मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले.
आजपासून लाल मैदानातल्या लाल मातीत हरवले–खोचा सूर
मुंबईच्या खो-खोप्रेमींचा काळजाचा ठोका चुकवायला परळचे लाल मैदान पुन्हा एकदा सज्ज झालेय. मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने आणि आरबीआय स्पोर्ट्स क्लबच्या यजमानपदाखाली ‘पहिली व्यावसायिक निमंत्रित खो-खो स्पर्धे’चा सूर थरार पाहायला मिळणार आहे. 14 ते 17 मेदरम्यान खो-खोप्रेमी आणि खो-खोरक्षक असलेल्या विद्यार्थी क्रीडा पेंद्राच्या लाल मैदानातील लाल मातीवर वेग आणि चपळाईचा अनोखा थरार पाहायला मिळेल. या व्यावसायिक स्पर्धेसाठी 12 संघ उतरणार आहेत. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, मुंबई पोलीस, बँक ऑफ इंडिया, मुंबई महानगरपालिका, आरबीआय, नेव्हल डॉक, महाराष्ट्र पोस्ट, महावितरण, ठाणे विशेष पोलीस सेल, गंधेकर इलेक्ट्रिकल्स आणि रचना नोटरी वर्क्स हे संघ स्पर्धेत असतील.
महापौर कॅरम सिद्धांत आणि मितालीला प्रथम मानांकन
मुंबई महापौर चषक जिल्हा मानांकन पॅरम स्पर्धा 16 व 17 मे 2026 या दोन दिवसांत रंगणार आहे. पुरुष एकेरी व महिला एकेरी अशा दोन गटांत ही स्पर्धा रंगणार असून पुरुष एकेरी गटात 120 तर महिला एकेरी गटात 24 खेळाडूंनी भाग घेतला आहे. पुरुष एकेरी गटात डी. के. सी. सी. च्या सिद्धांत वाडवलकरला तर महिला एकेरी गटात जैन इरिगेशनच्या मिताली पाठकला प्रथम मानांकन देण्यात आले आहे.
पुरुष एकेरी – 1) सिद्धांत वाडवलकर, 2) प्रशांत मोरे, 3) विकास धारिया, 4) नीरज कांबळे, 5) निलांश चिपळूणकर.
स्त्री एकेरी – 1) मिताली पाठक, 2) सोनाली कुमारी, 3) आयशा साजिद खान, 4) अंजली सिरीपुरम, 5) सिमरन शिंदे.
Comments are closed.