IPL 2026 – ‘टॉप टू’ म्हणजे ट्रॉफीची गॅरंटी! आयपीएलमध्ये18 पैकी 16 वेळा ‘टॉप टू’ संघच विजेते
>>मंगेश वरवडेकर<<
आयपीएल म्हणजे क्रिकेटचं महाभारत. इथे प्ले ऑफला पोहोचणं म्हणजे युद्ध जिंकणं नव्हे. खरा धर्मयुद्धाचा नियम वेगळाच आहे. ‘टॉप टू’मध्ये आलात तरच तुम्ही अर्जुन, नाहीतर बाकीचे सगळे अभिमन्यू. ‘टॉप टू’ म्हणजे जेतेपदाची व्हीव्हीआयपी रांग. थेट ट्रॉफी दर्शन. गेल्या 18 वर्षांच्या इतिहासाचे पंचांग उघडले तर 16 वेळा ‘टॉप टू’चाच झेंडा फडकलाय. बाकी तिसरा-चौथा क्रमांक म्हणजे वरातीत नाचायला आलेले पाहुणे ठरलेत. मिरवणूक निघाली की त्यांना कोण विचारतो? ‘टॉप टू’ खऱ्या अर्थाने जेतेपदाचा एक्स्प्रेस वे आहे. तुम्ही अंतिम फेरीत सुस्साट पोहोचता. म्हणूनच ‘टॉप टू’ स्थान मिळवण्यासाठी बंगळुरू, गुजरात आणि हैदराबाद यांच्यात धडपड अजूनही सुरूय. ती धडपड शुक्रवारी संपेल.
'वर करण्यासाठी'म्हणजे कुबेराचा खजिना
2008 साली आयपीएलचा जन्म झाला तेव्हा प्ले ऑफ नावाचा प्रकार नव्हताच. तेव्हा राजस्थान रॉयल्स गटात पहिला आला आणि तो थेट मुकुट घालून मिरवला. 2009 ला चौथ्या क्रमांकाच्या डेक्कन चार्जर्सने नशिबाची लॉटरी काढली. पण 2010 पासून क्वालिफायर-एलिमिनेटरचं सर्कस सुरू झालं आणि नियम बदलला. तिसऱ्या क्रमांकाच्या चेन्नईने तेव्हा कप उचलला. पण बस्स. ती शेवटची चूक होती. त्यानंतर हे पुन्हा घडले नाही.
त्यानंतरचा इतिहास म्हणजे ‘टॉप टू’ची एकाधिकारशाही. चेन्नईने 2011 ला ‘टॉप टू’मध्ये येऊन जेतेपद राखलं आणि सांगून टाकलं, बाळांनो, ‘टॉप टू’मध्ये या, नाहीतर घरी जा. आयपीएलमध्ये 18 पैकी 16 वेळा ‘टॉप टू’च जिंकलाय. म्हणजे 89 टक्के जेतेपदाची गॅरंटी. ही एलआयसीच्या पॉलिसीपेक्षाही भक्कम आहे.
एलिमिनेटर म्हणजे एक्झिट गेट
‘टॉप टू’संघाला प्ले ऑफमध्ये लाइफ लाइन मिळते. क्वालिफायर वन हरला तरी क्वालिफायर टू खेळून फायनल गाठता येते. पण तिसरा-चौथा? त्यांच्यासाठी एलिमिनेटर म्हणजे करो या मरो नव्हे, हारो आणि घर जाओ. एक चूक आणि थेट फ्लाइट बुक. म्हणूनच हे दोन क्रमांक म्हणजे आयपीएलमधले अस्पृश्यच आहेत. त्यांनी फक्त दोनदाच ट्रॉफीला हात लावलाय. बाकी 16 वेळा ते फक्त टाळय़ा वाजवायलाच उभे होते.
फायनल म्हणजे 'वर करण्यासाठी'ची प्रायव्हेट पक्ष
आता आयपीएलचा कहर ऐका. 18 पैकी 11 वेळा फायनलच ‘टॉप टू’च्या दोन संघातच रंगलीय. 2013 पासून तर मुंबई-चेन्नई या दोन दादा संघांनी ‘टॉप टू’वर जणू वतनदारीच लावली. 2013, 2015, 2019 या तिन्ही वेळेला हे दोघेच ‘टॉप टू’मध्ये आले आणि फायनलही खेळले. म्हणजे गुणतालिका म्हणजे यांचं फॅमिली फंक्शन. बाकीचे संघ फक्त कॅटरिंगला आल्यासारखेच सर्व्हिस देत राहिले.
कोण होणार 'वर करण्यासाठी'चा मानकरी?
आता प्ले ऑफचे तीन शिकारी पक्के झालेत, पण चौथ्या जागेसाठी पाच भुकेले संघ झुंजताहेत. पण खरी लढाई आहे ‘टॉप टू’ची. बंगळुरू, गुजरात आणि हैदराबाद हे तीन मल्ल आता ‘टॉप टू’ च्या तख्तासाठी आखाडय़ात उतरलेत. शुक्रवारी चित्र स्पष्ट होईल. जो जिंकेल तो ट्रॉफीच्या एक पाऊल जवळ असेल. ते दोन्ही संघ कोणतेही असू शकतात.
शुक्रवारी रात्री बंगळुरू-हैदराबाद भिडणार आहेत. बंगळुरू जिंकला तर थेट सिंहासनावर. हरला तर हैदराबादला लॉटरी. तसेच गुजरातने चेन्नईला हरवत दुसऱ्या स्थानासाठी आपला दावा मजबूत केला आहे. तर तोही रांगेत असेल. विशेष म्हणजे, यंदा अव्वल तिघांचे गुण समान होण्याची शक्यता आहे. असा ‘त्रिवेणी संगम’ याआधी 2019 लाच झाला होता. मुंबई, चेन्नई, दिल्ली या तिन्ही संघाचे 18-18 असे समान गुण झाले होते. पण रनरेटच्या कात्रीत दिल्ली कापली गेली आणि ‘टॉप टू’च्या मुंबई-चेन्नईनेच फायनल खेळली. 2013, 2018, 2025 या मोसमात ‘टॉप टू’ संघाचे गुण समान झाले होते आणि त्यांनीच फायनल खेळून दाखवली. म्हणजे ‘टॉप टू’ हा फक्त क्रमांक नाही, तो आयपीएलचा ‘राजयोग’ आहे.
त्यामुळे तिसऱ्या-चौथ्याने जिंकायचं स्वप्न पाहू नये. पाहिलं तर तो ‘आश्चर्याचा धक्का’ नसेल, ती क्रिकेटच्या दैवताची क्रूर थट्टा असेल. कारण इथे नियम एकच. ‘टॉप टू’ मध्ये नाव कोरलं की ट्रॉफीवरही नाव कोरलंच म्हणून समजा!
Comments are closed.