सीएसकेकडून पराभव झाल्यानंतर हार्दिक झाला भावूक! म्हणाला, “केवळ रात्रच नाही तर संपूर्ण आयपीएल…”

आयपीएल २०२६ मध्ये चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्स विरुद्धचे दोन्ही सामने जिंकले आहेत. शनिवारी (२ मे) चेपॉकवर झालेल्या सामन्यात एमआयने प्रथम फलंदाजी करताना १५९ धावा केल्या होत्या. यामध्ये फिनिशर म्हणून हार्दिक पांड्या पूर्णपणे अपयशी ठरला. त्याने २३ चेंडूत केवळ १८ धावा केल्या. सामन्यानंतर त्याने म्हटले की, सीएसके प्रत्येक विभागांमध्ये वरचढ होती.

एमआयच्या पराभवानंतर प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये पांड्याला विचारले, “आजचा दिवस तुझ्यासाठी चांगला नव्हता का?” तेव्हा त्याने उत्तर दिले, ” मला वाटतं, हा केवळ आजचा रात्रीचाच नव्हे, तर संपूर्ण हंगामाचाच प्रश्न आहे. संपूर्ण हंगामच आमच्यासाठी चांगला गेलेला नाही.” यावेळी त्याने सीएसकेचे कौतुकही केले आहे. तो म्हणाला, “ते अधिक चांगले क्रिकेट खेळले. त्यांची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सर्वच उत्तम होते.”

या सामन्यात एमआयने ११ षटकात १०० धावा पूर्ण केल्या होत्या. यामुळे उर्वरित षटकांमध्ये संघ आणखी १०० धावा जोडेल अशी आशा होता, मात्र तसे घडले नाही. हार्दिक फलंदाजीवेळी संघर्ष करताना दिसला. त्याबद्दल तो म्हणाला, “एके काळी आम्ही १८०-१९० धावा करण्याच्या मार्गावर होतो. १० षटकानंतर आम्ही आमची लय कायम ठेवू शकलो नाही.”

“डावाच्या सुरूवातीला फटकेबाजी करणे सोपी नसते. विचारपूर्वक खेळी करणे अधिक महत्त्वाचे होते, जे सीएसकेने चांगल्या प्रकारे केले. आमच्या फलंदाजांना चेंडूवर वर्चस्व गाजवता आले नाही, त्यांची गोलंदाजी सरस होता. आम्ही त्यांना जेवढे होतील, तेवढे आक्रमक चेंडू टाकले. आमच्याकडे जे गोलंदाजीचे पर्याय उपलब्ध होतो त्यांचा आम्ही वापर केला, मात्र त्यांनी अत्यंत हुशारीने क्रिकेट खेळले आणि तेच सरस ठरले”, असेही पांड्याने पुढे म्हटले आहे.

सीएसकेने लक्ष्याचा पाठलाग १८.१ षटकात केवळ २ विकेट्स गमावत पूर्ण केला. यामध्ये कर्णधार ऋतुराज गायकवाड ६७ धावा आणि कार्तिक शर्मा ५४ धावा करत नाबाद राहिले.

Comments are closed.