आयपीएल मिनी लिलावापूर्वी मोठा बदल! 'या' कारणामुळे खेळाडू रिटेन करण्याची मुदत वाढवली
बीसीसीआयने (BCCI) आयपीएलसाठी (IPL) खेळाडूंना रिटेन करण्याची अंतिम मुदत दोन दिवसांनी वाढवली आहे. 2 नोव्हेंबर रोजी बीसीसीआयने सर्व फ्रँचायझी संघांना याबाबत माहिती दिली. या नव्या निर्णयानुसार, आता संघांना आपल्या अंतिम खेळाडूंची यादी सादर करण्यासाठी 15 नोव्हेंबरऐवजी 17 नोव्हेंबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे.
मात्र, आयपीएलच्या मिनी लिलावाची तारीख आणि ठिकाण यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हा लिलाव पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार 16 डिसेंबर रोजी गोव्यातच होणार आहे.
बीसीसीआयने (BCCI) हा बदल करण्यामागचे कारण म्हणजे 15 नोव्हेंबर रोजी भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात पाचवा आणि शेवटचा वनडे सामना होणार आहे. हा सामना माउंट मौंगानुई येथे खेळवला जाणार आहे. भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार असून, 4 नोव्हेंबरपासून पाच सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. 15 नोव्हेंबर रोजी सामना असल्यामुळे खेळाडूंची अंतिम यादी निश्चित करण्यासाठी बीसीसीआयने सर्व संघांना दोन दिवसांची अतिरिक्त मुदत दिली आहे. त्यामुळे आता सर्व संघ 17 नोव्हेंबरपर्यंत रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची यादी सादर करू शकतात.
विशेष म्हणजे, 16 डिसेंबर रोजी आयपीएलचा लिलाव होणार आहे. त्याच दिवशी भारत आणि श्रीलंका (India & Srilanka) यांच्यातील दुसरा वनडे सामनाही खेळवला जाणार आहे. हा सामना बेंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. असे असूनही बीसीसीआयने लिलावाच्या तारखेत कोणताही बदल केलेला नाही.
दरम्यान, आयपीएल लिलावात सहभागी होण्यासाठी खेळाडूंच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व संघांना खेळाडूंना रिटेन किंवा रिलीज करण्यासाठी 17 नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तर खेळाडूंच्या नोंदणीची प्रक्रिया 23 नोव्हेंबर रोजी बंद होणार आहे. त्यानंतर लिलावात सहभागी होणाऱ्या खेळाडूंची अंतिम यादी 3 डिसेंबर रोजी जाहीर केली जाईल. लिलावापूर्वी ट्रेडिंग विंडोही सुरू आहे. या माध्यमातून अनेक खेळाडू एका संघातून दुसऱ्या संघात जाण्याची शक्यता आहे.
Comments are closed.