डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवल्यानंतरही होर्मुझ अशांतच; इराणचा मालवाहू जहाजावर अंदाधुंद गोळीबार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम अनिश्चित काळासाठी वाढवण्याची घोषणा केली. ही घोषणा करून काही तास उलटत नाही तोच होर्मुझची सामुद्रधुनी गोळीबाराने दणाणली आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये एका मालवाहू जहाजावर गोळीबार केला. ब्रिटिश लष्कराने याबाबत माहिती दिली आहे. या हल्ल्यामुळे आखातातील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला असून शांतता चर्चेवरही याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

ब्रिटिश लष्कराच्या युनायटेड किंगडम मॅरिटाइम ट्रेड ऑपरेशन्स केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी 7 वाजून 55 मिनिटांच्या सुमारास IRGC ने एका कंटेनर जहाजावर गोळीबार केला. हा गोळीबार करण्यापूर्वी इराणकडून कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती. या गोळीबारात जहाजाचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच तेल गळतीचाही धोका नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ‘एनडीटीव्ही‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान, इराणच्या ‘फार्स’ आणि ‘तस्नीम’ या वृत्तसंस्थांनी जहाजावरील हल्ल्याला दुजोरा दिला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचे नियंत्रण कायदेशीररित्या लागू करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले. दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला चर्चेसाठी वेळ देण्यासाठी युद्धविराम वाढवला असला तरी होर्मुझमधील लष्करी नाकेबंदी सुरूच ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Iran US ceasefire – डोनाल्ड ट्रम्प यांचा घुमजाव; इराणसोबतचा युद्धविराम वाढवला, हादरवणारं कारण आलं समोर

इराणची आर्थिक स्थिती ढासळत आहे. त्यांना होर्मुझची सामुद्रधुनी तातडीने खुली हवी आहे कारण ते पैशांसाठी तडफडत आहेत. त्यांचे दिवसाला 500 मिलियन डॉलरचे नुकसान होत आहे. पोलीस आणि लष्करानेही वेतन मिळत नसल्याची तक्रार केली आहे, अशी पोस्ट ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर केली आहे.

Comments are closed.