भाजपचा बिनविरोध पॅटर्न, मंत्री गिरीश महाजनांची पत्नी नगराध्यक्षपदी विजयी; शिवसेनेला ‘दे धक्का’


जळगाव : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने (BJP) यंदा बिनविरोध पॅटर्न राबवल्याचं पाहायला मिळत आहे. ऑपरेशन लोटसमध्ये भाजपने निवडणुकांच्या अगोदरच अनेक माजी आमदार आणि जिल्ह्यातील बडे नेते गळाला लावले. त्यानंतर, आता नगरपरिषद (Nagarpalika election) आणि नगरपंचायत निवडणुकीत बिनविरोध पॅटर्न सुरू केल्याचं दिसून येत आहे. कारण, सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंयायत, त्यानंतर धुळे जिल्ह्यातील दोंडाई आणि आता जळगाव जिल्ह्यातील जामनेर नगरपालिकेत अध्यक्षपदी भाजप नेत्यांची बिनविरोध वर्णी लागल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे, या तिन्ही महिला उमेदवार असून दोन विद्यमान भाजप मंत्र्‍यांच्या कुटुंबातील सदस्या आहेत. जामनेर नगरपालिका निवडणुकीत साधना महाजन (Girish mahajan) यांची बिनविरोध निवड झाली आहे. महाविकास आघाडीच्या ज्योत्स्ना विसपुते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. विसपुतेंनी अर्ज माघारी घेतल्याने साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.

धुळे जिल्ह्यातील दोंडाई येथे भाजप नेते तथा मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुमार रावल ह्या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. त्यानंतर, आता  जामनेरमध्ये गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांचीही बिनविरोध निवड झाल्याने भाजपने विजयी जल्लोष केला. तत्पूर्वी, सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीसाठी भाजप नेते माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील ह्याही बिनविरोध विजयी झाल्या आहेत. त्यामुळे, राज्यात भाजपचा बिनविरोध निवडणुकीचा पॅटर्न काही जिल्ह्यात यशस्वी होताना दिसून येत आहे. दरम्यान, अमरावती येथील चिखलदरा नगरपरिषदेतही भाजपचे नगरसेवक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ बिनविरोध विजयी झाल्याचं पाहायला मिळालं.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला दे धक्का

जामनेर नगरपालिका निवडणुकीत साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाली असून दोन ठिकाणी नगरसेवक पदासाठी देखील शिवसेनेला धक्का देण्यात आला आहे. शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरलेल्या दोन उमेदवारांनी अर्ज माघारी घेत भाजपमध्ये प्रवेश केला. जामनेरमध्ये भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवेसेनेचे दोन उमेदवार आमने सामने उभे ठाकले होते. शिंदेंच्या शिवसेनेकडून वॉर्ड नंबर 1 मधून मयुरी चव्हाण आणि वॉर्ड नंबर 13 ब मधून रेशंता सोनवणे यांनी अर्ज दाखल केला होता. तर भाजपकडून वॉर्ड 1 नंबर सपना झाल्टे आणि वॉर्ड नंबर 13 मधून किलुबाई शेवाळे यांनी अर्ज केला होता. त्यामुळे, या ठिकाणी भाजप विरूद्ध एकनाथ शिंदे यांच लढत होणार होती. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केलेल्या मयुरी चव्हाण आणि रेशंता सोनवणेंकडून अर्ज मागे घेत भाजपमध्ये प्रवेश करण्यात आला.

हेही वाचा

Tamhini ghat: 20 दिवसांपूर्वीच घेतलेली ‘थार’ ताम्हिणी घाटात कोसळली, दोन दिवसांनी घटना समोर; 4 जणांचा मृत्यू

आणखी वाचा

Comments are closed.