। जनी आपले हित तुवा करावे।

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

समर्थांचा हा बोधपर अभंग सदैव ध्यानात ठेवावा असा आहे. समर्थ, समजावून सांगत आहेत की हे मना, आपले स्वतचे हित हे आपणच करायचे असते. त्यासाठी हित कोणते -आहित कोणते याचे भान असले पाहिजे. विवेकाने हित -आहित जाणून घेतले पाहिजे. संत तुकाराम हित जाणणाऱयाला ‘जागता’ म्हणतात. ‘आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया’ वर्तमानकाळाच्या पार्श्वभूमीवर या अभंगाकडे पाहिलेत तर आपले हित कशात आहे याचे भान हरपलेली मुलंच नव्हे तर, मातापिताही सभोवताली दिसतात. लहानपणी सांगितली गेलेली एक गोष्ट आठवते. चोरी करण्याच्या सवयीकडे दुर्लक्ष करणाऱया आईचा कान तोच दरोडेखोर झालेला मुलगा चावतो, तेव्हा आईला आपल्या मुलाचे आपणच अहित केले आहे याचे भान येते पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. तुकाराम बुवा म्हणतात, ‘कुळी कन्या पुत्र, होती जी सात्विक तया हरिख वाटे देव। गीता भागवत, करिती श्रवण। अखंड चिंतन विठोबाचे। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही।’ सात्विक वृत्तीची मुलं मुली ज्या कुळात जन्माला येतात त्या कुळाचा देवालाही अभिमान वाटतो. गीता, भागवत, रामायण, ज्ञानेश्वरी, गुरुचरित्र, दासबोध यासारख्या ग्रंथपठनाने, थोरामोठय़ांच्या प्रबोधनातून आपल्या हिताचा मार्ग शोधण्याचा विवेक जागा होत जातो.

– संध्या शहापुरे

Comments are closed.