सातारा जिल्हा परिषदेत महायुती म्हणून पुढं जाऊ, गरज पडल्यास चमत्कार करु : जयकुमार गोरे
सोलापूर : सातारा जिल्हा परिषदेमध्ये (Satara ZP) भाजपचे (BJP) सर्वात जास्त 27 सदस्य निवडून आले आहेत. एक अपक्ष आमच्या सोबत आलेला आहे, असं जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी म्हटलं. सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपाचाच होईल यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरिष्ठ स्तरावर बोलत आहेत. साताऱ्यात महायुती म्हणून पुढे जाऊ मात्र तसे न घडल्यास चमत्कार करायची इच्छा नाही पण वेळ पडल्यास चमत्कार करून दाखवावा लागेल असे उत्तर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले आहे.
गरज पडल्यास चमत्कार करणार : जयकुमार गोरे
साताऱ्यात भाजपाला बाजूला ठेवून शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील यांनी जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. याबाबत आज जयकुमार गोरे यांनी बोलताना सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपाचा करण्यासाठी आमच्यासमोर देखील सर्व पर्याय खुले आहेत असे सांगितले आहे. महायुती म्हणून पुढे जाऊ मात्र असे न घडल्यास चमत्कार करून दाखवू असे थेट संकेत गोरे यांनी दिल्याने आता सातारा जिल्हा परिषदेमध्ये महायुती अंतर्गत कुरघोड्याचे राजकारण अजून रंगणार आहे.
शिवसेना राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्यास एकनाथ शिंदेंचा ग्रीन सिग्नल
मंत्री मकरंद पाटील, मंत्री शंभूराज देसाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची मुंबईतील नंदनवन बंगल्यावर दोन दिवसांपूर्वी भेट घेतली असल्याची माहिती आहे. साताऱ्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून मंत्री देसाई आणि मकरंद पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेच्या संदर्भात भेट घेतली असल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी ग्रीन सिग्नल देण्यात आल्याची माहिती आहे. साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सत्ता स्थापन करणार अशी माहिती खात्रीशीर सूत्रांकडून देण्यात आली आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी यांच्या दाराआडच्या बैठका आणि नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य आऊट ऑफ कव्हरेज असल्यामुळे सातारा जिल्हा परिषदेच्या सत्ता संघर्षाने राज्याचे लक्ष साताऱ्याकडे वेधलं आहे.
दरम्यान, भाजपनं सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक स्वबळावर लढवली होती. भाजपचे साताऱ्यात स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न होते. मात्र, भाजपला 27 जागांपर्यंत मजल मारता आली.
सातारा जिल्हा परिषद संख्याबळ : एकूण जागा 65
भाजप : 27
राष्ट्रवादी काँग्रेस : २०
शिवसेना : 16
स्वाभिमानी शेतकरी संघटना : 01
काँग्रेस : 01
अपक्ष : 01
आणखी वाचा
Comments are closed.