राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना अगोदर न्याय द्यावा : कैलास पाटील

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून कथितरित्या ‘ऑपरेशन टायगर 3’ राबविण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा सुरु आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर 3.0 ची जबाबदारी आमदार डॉ. तानाजी सावंत आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय ॲड. निलेश देशमुख यांच्यावर देण्यात आल्याचं कळतंय. या सर्व घडामोडींवर आदित्य ठाकरे आणि कैलास पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्ताधाऱ्यांनी 237 आमदारांना न्याय देता येतो का ते पाहावं, असं म्हटलं.

237 आमदारांना न्याय द्या : कैलास पाटील

कैलास पाटील म्हणाले की, ऑपरेशन टायगरबाबत माझं काय म्हणणं आहे, या चर्चा करणाऱ्यांनी आणि या चर्चा पसरवणाऱ्यांनी महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आहेत ते पाहावेत. एका बाजूला महापूर आलाय, एका बाजूला बोगस बियाण्याचा प्रश्न आहे. एका बाजूला पेरणी नाही झालेली, अशा प्रश्नांकडे लक्ष द्या, असं कैलास पाटील म्हणाले.  माझं मत स्पष्ट हे आहे की सरकारमध्ये जे लोक बसले आहेत त्यांना स्पष्ट बहुमत आहे. तुमच्या सोबत जे आमदार आहेत, त्यांची संख्या 237 आमदार इतकी आहे.  त्यांना न्याय देता आला तर पाहावं, असं कैलास पाटील म्हणाले.

कैलास पाटील कर्जमाफीवर काय म्हणाले?

मुख्यमंत्र्यांनी आज एक चांगली गोष्ट केली की सुरुवातीला जे 2019 च्या कर्जमाफीत असल्यानं जे वगळले होते शेतकरी त्यांना परत घेऊ असं सांगितलं. सगळ्यांची मागणी होती, शेतकऱ्यांमध्ये रोष होता. नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यासंदर्भात सूट काही सूट दिलेली आहे, असं कैलास पाटील म्हणाले. मला आणि सगळ्यांना अपेक्षा होती की मुख्यमंत्री कर्जमाफीची तारीख सांगतील. अगोदर 30 जूनची तारीख दिली होती, ती  5 जुलै झाली, आज देखील तारीख सांगितली गेली नाही. कर्जमाफी देंगे लेकीन तारीख नाही बतायगे असं काम झालंय, असं कैलास पाटील म्हणाले.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

तुम्ही ऑपरेशन टायगर म्हणताय, तुम्हाला किती ऑपरेशन करायचे ते करा पण तुम्ही ऑपरेशन टायगर पेक्षा ऑपरेशन देवेंद्र याकडे लक्ष द्या, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, या दोन्ही गटांतील काही आमदार आणि खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा केला जातोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील  10 आमदारांनी शिंदे गटात प्रवेश करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचा दावा शिंदे गटातील सूत्रांकडून करण्यात आलाय.

हेदेखील वाचा

Comments are closed.