कल्पेश कोळी स्पर्धा आजपासून
हिंदुस्थानी क्रिकेट गाजवणारे रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, आयुष म्हात्रे असे क्रिकेटपटू कल्पेश कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेत खेळून मुंबई क्रिकेटमध्ये चमकले, त्या गुणवत्तेचा शोध घेणारी स्पर्धा शनिवार, 2 मेपासून सुरू होतेय. यंदा या स्पर्धेत वेगवान गोलंदाजांचा शोध घेतला जाणार असून त्यासाठी नियमात मोठा बदल करण्यात आला आहे.
पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटचे वर्चस्व असताना 16 वर्षांखालील वयोगटासाठी असलेली कल्पेश कोळी ही स्पर्धा मुंबई संघटनेची चाचणी स्पर्धा समजली जाते. या स्पर्धेत प्रत्येक संघाने पहिल्या डावात सुरुवातीला पाच-पाच षटके वेगवान गोलंदाजांना देणे बंधनकारक केले आहे. कधी कधी फिरकी गोलंदाजांकडून डावाची सुरुवात केली जाते. त्यामुळे वेगवान गोलंदाज दुर्लक्षित होत असतात. यासाठी हा महत्त्वाचा नियम करण्यात आला आहे. या स्पर्धेत एकूण 27 सामने खेळविले जाणार असून ही स्पर्धा 2 ते 23 मे या कालावधीत कांदिवली, विरार, डहाणू, चेंबूर, कलिना, माटुंगा, नवी मुंबईतील विविध मैदानांवर रंगणार आहे. मुंबईतील 16 केंद्र या स्पर्धेत आपला खेळ दाखवतील.
Comments are closed.