‘किंग खान’चे शिलेदार जिंकले! रहाणेच्या बॅटची जादू अन् रघुवंशीचा राडा; हैदराबादचा किल्ला ढासळला,

कोलकाता नाइट रायडर्सने सनरायझर्स हैदराबाद IPL 2026 चा पराभव केला: आयपीएल 2026 मधील 45 व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने (KKR) सनरायझर्स हैदराबादवर (SRH) 7 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात केकेआरच्या गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी वर्चस्व गाजवले. जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा कर्णधाराचा निर्णय चुकला, कारण संपूर्ण संघ 19 षटकांत अवघ्या 165 धावांवर गारद झाला. माफक आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या कोलकाता नाइट रायडर्सने हे लक्ष्य 3 गडी राखून सहज पूर्ण केले. या विजयामुळे केकेआरच्या आत्मविश्वासात वाढ झाली असली, तरी गुणतालिकेत त्यांच्या स्थितीत मोठा बदल झालेला नाही.

ट्रॅव्हिस हेडची वादळी खेळी

डावाची सुरुवात अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या 3.4 षटकांत 44 धावांची झपाट्याने भागीदारी केली. अभिषेक शर्मा 10 चेंडूत 15 धावा करून बाद झाला, त्याला कार्तिक त्यागीने बाद केले. यानंतर ईशान किशन क्रीजवर आला आणि त्याने ट्रॅव्हिस हेडसोबत डाव सावरला. हेडने 28 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांसह 61 धावांची शानदार खेळी करत अर्धशतक पूर्ण केले. किशननेही 29 चेंडूत 42 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याला सुनील नरेनने बाद केले.

वरुण चक्रवर्तीची प्रभावी गोलंदाजी

या दोघांशिवाय इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. हेनरिक क्लासेन (11) आणि कर्णधार पॅट कमिन्स (10) लवकर बाद झाले. कोलकात्याकडून वरुण चक्रवर्तीने 4 षटकांत 36 धावा देत 3 महत्त्वाचे बळी घेतले. त्याच्यासोबत सुनील नारायण आणि कार्तिक त्यागी यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेत हैदराबादचा डाव आवरता घेतला.

रहाणेच्या बॅटची जादू अन् रघुवंशीचा राडा

फिन ऍलन आणि अजिंक्य रहाणे यांनी कोलकाता नाईट रायडर्ससाठी डावाची सुरुवात केली. 49 धावांवर संघाला पहिला धक्का बसला. ऍलनने 13 चेंडूंमध्ये तीन चौकार आणि दोन षटकारांसह 29 धावा केल्या, पण तो पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर हेनरिक क्लासेनकरवी झेलबाद झाला. त्यानंतर अंगक्रिश रघुवंशी आणि अजिंक्य रहाणे यांनी डाव सावरला. अजिंक्य रहाणेने 36 चेंडूंमध्ये चार चौकार आणि एका षटकारासह 43 धावा केल्या, तर अंगक्रिश रघुवंशीने 47 चेंडूंमध्ये पाच चौकार आणि दोन षटकारांसह 59 धावा केल्या. रिंकू सिंगने 22 धावांचे, तर कॅमेरॉन ग्रीनने 3 धावांचे योगदान दिले. सनरायझर्स हैदराबादकडून पॅट कमिन्स, शिवांग कुमार आणि हुसेन साकिब यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

गुणतालिकेतील समीकरण

या सामन्यानंतर आयपीएल 2026 च्या ‘पॉइंट्स टेबल’मध्ये काही महत्त्वाचे बदल पाहायला मिळाले. सनरायझर्स हैदराबादला या पराभवाचा मोठा फटका बसला आहे. 10 सामन्यांत 12 गुणांसह ते आता तिसऱ्या क्रमांकावरून आहेत. प्ले-ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी त्यांना आता पुढच्या सामन्यात विजय मिळवणे अनिवार्य असेल. तर विजयानंतरही केकेआर आठव्या क्रमांकावर कायम आहे. त्यांच्या खात्यात सध्या 9 सामन्यांत 3 विजय आणि 5 पराभवांसह 7 गुण आहेत.

हे ही वाचा –

Sunil Narine 200 IPL Wickets : 200 NOT OUT! आयपीएलच्या इतिहासात जे कोणालाच जमलं नाही, ते नरेनने करून दाखवलं! हैदराबादमध्ये नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.