व्यायाम संस्कृतीचा आधारस्तंभ हरपला; शरीरसौष्ठव मार्गदर्शक लक्ष्मण बोवलेकर यांचे निधन
मुंबईच्या शरीरसौष्ठव क्षेत्रात अनेक पीळदार शरीरयष्टी घडविणारे आणि व्यायाम संस्कृतीला प्रतिष्ठा मिळवून देणारे ज्येष्ठ मार्गदर्शक लक्ष्मण बोवलेकर यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने शरीरसौष्ठव क्षेत्रातील एक भक्कम आधारस्तंभ हरपला आहे.
बोवलेकर हे केवळ व्यायामशाळेचे संचालक नव्हते, तर शरीरसौष्ठवाची चळवळ तळागाळात रुजवणारे कार्यकर्ते होते. मुंबई उपनगर शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्षपदासह विविध जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी या खेळाच्या प्रसारासाठी मोलाचे योगदान दिले. 1975 मध्ये त्यांनी बोवलेकर हेल्थ सेंटरची स्थापना करून व्यायाम क्षेत्रात पाऊल ठेवले. मुलगा दिलीप आणि कुटुंबीयांच्या सहकार्याने पश्चिम आणि पूर्व उपनगरात व्यायामशाळांचे जाळे विस्तारले. कोरोनाच्या संकटाचा त्यांच्या व्यवसायालाही फटका बसला.
मधुकर तळवलकर, विकी गोरक्ष, विजू पेणकर, भाई कदम आणि माधव पुजारी यांसारख्या दिग्गजांच्या मांदियाळीत त्यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्या निधनाने शरीरसौष्ठव क्षेत्राने अनुभवी मार्गदर्शक गमावला असून त्यांनी रुजवलेली व्यायाम संस्कृती पुढील पिढय़ांना प्रेरणा देत राहील.
Comments are closed.