उद्या दुपारी 12 पर्यंत रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या अन्यथा…, लक्ष्मण हाके यांचा इशारा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अडचणीत आल्या आहेत. नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात याला महिलांवरील अत्याचार प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. रुपाली चाकणकर यांचे अशोक खरात याचं पाद्यपूजन करतानाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. यानंतर राज्यातील विरोधी पक्षांकडून रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी देखील राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रुपाली चाकणकर यांचा उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे.

रुपालीताईंचा राजीनामा घ्या : लक्ष्मण हाके

हा महाराष्ट्र फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रातील राजकारण्यांना, मंत्रिमंडळाला जर भोंदू बाबांनी विळखा घातला असेल,जादूटोणा वाल्यांनी विळखा घातला असेल तर पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेनं खाली गेली आहे. या रुपालीताई चाकणकरांचा उद्या दहा, अकरा, बारा वाजेपर्यंत सुनेत्राताईंनी राजीनामा घ्यावा, नाही तर सुनेत्राताईंच्या घरासमोर आम्हाला उपोषणाला बसावं लागेल. महिला आयोगाच्या अध्यक्षपदी सुमार दर्जाची महिला ठेवली. महाराष्ट्रानं जादूटोणाविरोधी, भोंदूगिरी विरोधी कायदा केला आहे. स्वर्गीय आर.आर. आबा पाटलांनी पुढाकार घेऊन कायदा बनवला आहे. हा कायदा पायदळी तुडवण्याचं काम मंत्रिमंडळात बसलेले नेते करत असतील, महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसलेल्या रुपालीताई करत असतील तर याच्याहून वाईट काय असू शकतं, असं लक्ष्मण हाके म्हणाले.

उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत रुपालीताईंचा राजीनामा आला पाहिजे, नाहीतर महाराष्ट्रात वेगळं आंदोलन उभं करावं लागेल. महिलांनी या रुपालीताईंकडून काय न्याय मागायचा. हे प्रकरण एपस्टीन फाईल पेक्षा वेगळं आहे. सुनेत्राताईंकडे विनंती आहे, उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत रुपालीताईंचा राजीनामा घ्यावा. राजीनामा घेतला नाही तर सुनेत्राताईंच्या बारामती, पुणे किंवा मुंबईतील घराबाहेर जाऊन बसू आणि सुमार दर्जाची माणसं, महाराष्ट्राचा कायदा पायदळी तुडवणाऱ्या रुपालीताईंचा राजीनामा घ्या, अशी मागणी सुनेत्रा पवार यांनी केली.

लक्ष्मण हाकेंचा सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवर आक्षेप

ओबीसींचं आरक्षण संपलेलं आहे, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत काय झालं? आरक्षण हे मागासवर्गीयांसाठी आहे, त्यांच्या तुलनेत फलटणचं सभापतीपद दिलं गेलं तिथं नऊ सदस्य ओबीसींचे निवडून आलेले, ते डावलून सभापतीपद दिलं गेलं. साताऱ्यात ओबीसी आरक्षणावर ताबा घेण्याचं काम झाल्याचं लक्ष्मण हाके म्हणाले.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.